राज्य सरकार डरपोक; पराभवाच्या भीतीने सिनेटची निवडणूक रद्द, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकार भीतीपोटी कोणतीही निवडणूक घेण्यास तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवासेनेचे पॅनेल 100 टक्के जिंकणार होते. या भीतीपोटी ही निवडणूक रद्द करण्यात आली, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या जाहीर झालेली सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत 17 ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती देणारे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केले. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी अशा किती निवडणुका रद्द करणार आहात? असा सवाल केला. शिवसेना जिंकेल या भीतीपोटी सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. आता सिनेटची निवडणूकही रद्द केली. चंद्रपूर आणि पुण्यातील लोकसभेची जागाही रिक्त आहे. तिथेही निवडणुका जाहीर केल्या नाहीत. भारतीय जनता पक्ष हरेल अशी भीती त्यांना वाटतेय. या भीतीपोटी ठरलेल्या वेळेत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही घेणार नाहीत का? या भीतीपोटी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा हल्ला राऊत यांनी चढवला.

निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची हे धोरण

सिनेटची निवडणूक रद्द करण्याचे काहीही कारण नव्हते. शिवसैनिक, युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे निवडणूक निवडणूक जिंकायचीच या इर्षेने उतरले होते आणि आम्ही जिंकणारच होतो. पण निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची हे नवीन धोरण महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईला महापौर नाही. पुणे, ठाणे, नागपूर या मोठ्या शहरांना महापौर नाही. महापौर हे त्या शहराचे कुंकू, सौभाग्य आहे. पण आपला पराभव होईल या भीतीने निवडणुका घेत नाहीत. आज सिनेटच्या निवडणुका रद्द करून सरकारने आपण किती घाबरलेलो, भयग्रस्त आहोत हे दाखवून दिले.

जिंकेल त्याची जागा हे सूत्र

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही राऊत यांनी भाष्य केले. महाविकास आघाडी मजबूत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी लोकसभा, विधानसभा एकत्र लढणार आहे. तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जागा वाटपावरून कुठेही मतभेद उघड करायचे नाहीत हे ठरवले आहे. एकत्र येऊन निवडणुका लढवायच्या असून जिंकायच्या हे सूत्र आमचे ठरले आहे. जिंकेल त्याची जागा हे सूत्र असल्याचे राऊत म्हणाले.

राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले! सिनेट निवडणूक स्थगित करण्यावरून युवासेनेची सडकून टीका

हे आव्हान आम्ही स्वीकारलेय

मुंबईमध्ये महिनाअखेरीस ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘भारत जितेगा’ हे आमचे घोषवाक्य आहे. पहिली बैठक नितीशकुमार यांची सत्ता असणाऱ्या पाटण्यात झाली. दुसरी बैठक काँग्रेसची सत्ता असणाऱ्या बंगळुरुत झाली. मात्र महाराष्ट्रात सत्ता नसताही आम्ही बैठक घेत आहोत. हे आव्हान आम्ही स्वीकारलेय. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, भगवंतसिंग मान, नितीशकुमार यांच्यासह तेजस्वी यादव, लालु प्रसाद यादव, फारूख अब्दुल्ला, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, सिताराम येचुरी असे सगळे प्रमुख नेते मुंबईत येणार आहेत. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होईल.