राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले! सिनेट निवडणूक स्थगित करण्यावरून युवासेनेची सडकून टीका

मुंबई विद्यापीठाची जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत 17 ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती देणारे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केले. प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांची सही असलेले हे पत्र असून त्यात म्हटले आहे की सिनेटची निवडणूक ही पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. या निवडणुकीतून विद्यापीठ अधिनियम 2016 नुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधर उमेदवार निवडून दिले जाणार आहेत.

10 सप्टेंबर 2023 रोजी होणारी ही निवडणूक सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना अचानकपणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली. यावरून माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मिंधे सरकारला त्यांचा पराभव आणि जवळपास 12 लोकसभा मतदार संघातील मतदारांचा कौल आपल्या विरुद्ध जाणार असल्याचे दिसल्याने तसेच जनतेमध्ये शासनाच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ उडणार असल्याच्या भितीमुळे शासनाने हि निवडणूक स्थगित केली आहे असे सावंत यांनी म्हटले आहे.