दिल्ली डायरी – ‘महाशक्ती’चा पक्षांतर्गत करेक्ट कार्यक्रम!

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

‘हम करे सो कायदा’ या न्यायाने गेल्या दहा वर्षांपासून देशाचा, भाजपचा कारभार हाकणाऱया दिल्लीतील ‘महाशक्ती’च्या ‘हम दो’ या धोरणाला आता तडे जाताना दिसत आहेत. राज्याराज्यांमधले महाशक्तीने अडगळीत टाकलेले तालेवार नेते गनिमी पद्धतीने आपले उपद्रव मूल्य या लोकसभा निवडणुकीत दाखवून देत आहेत. रा. स्व. संघाचे केडरही निवडणुकीत तटस्थ आहे. ही सगळी मंडळी उघड बंडाची भूमिका घेत नसली तरी आतून त्यांनी महाशक्तीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करायला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत सध्या प्रत्येक मतदारसंघात सभा घेत फिरावे लागत आहे. ही जी दमछाक झाली आहे, होत आहे, त्याला कारणीभूत त्यांचेच अहंकारी राजकारण कारणीभूत आहे. सामुदायिक नेतृत्वावर भाजपमधील सध्याचे सर्वशक्तीमान ‘हम दो’चा विश्वास नाही. त्यामुळे दोघांव्यतिरिक्त तिसऱया कोणत्याही व्यक्तीला सरकार किंवा पक्ष संघटनेत स्थान नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम आता दिसून येत आहे. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे व रमणसिंग ही मंडळी त्या त्या राज्यातली तालेवार नेते असले तरी हम दोच्या ‘बॅड बुक’मध्ये असल्याने त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचे उद्योग झाले. लोकसभेनंतर योगी आदित्यनाथांचाही ‘शिवराजमामा’ होईल, अशी चर्चा आतापासूनच रंगली आहे. ही मंडळी उघड बंडाची भूमिका घेत नसली तरी आतून त्यांनी महाशक्तीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करायला सुरुवात केली आहे. शिवराजसिंह, वसुंधराराजे व रमणसिंग हे त्या त्या राज्यांमधले लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहेत. कोणाच्या नावाच्या ‘गॅरंटी’शिवाय या मंडळींनी पक्षाची सत्ता अनेकदा आणून दाखविली आहे. या तिघांचा दोष इतकाच की, ते दिल्लीतील महाशक्तीला नकोसे आहेत. पूर्वी मुख्यमंत्री किंवा महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करायच्या झाल्या तर रा. स्व. संघाचा फायनल कॉल असायचा. मात्र आता ती स्थिती नाही. त्यातच ‘चाल, चरित्र, चेहरा’ या मंत्राचा टाळ कुटताना बाहेरच्या पक्षांतले अत्यंत भ्रष्ट व बदमाश नेते आयात करायचे व त्यांना सत्तेत बसवायचे ही ‘चाणक्य नीती’ वगैरे असल्याने केडरच्या कार्यकर्त्यांमध्ये देशभरात अस्वस्थता आहे. या निवडणुकीत भाजपची जी दमछाक होत आहे त्यामागे या कार्यकर्त्यांची निष्क्रियता हा एक मुद्दा आहे. ज्या मध्य प्रदेशात शिवराजमामांचा बोलबाला होता, तिथे त्यांचे नाव स्टार पॅम्पेनर म्हणूनदेखील ठेवलेले नाही. त्यामुळे मामा फक्त आपल्या मतदारसंघापुरते उरले आहेत. त्याचा वचपा ते चार-पाच जागांवर काढतील असे मानले जात आहे. वसुंधराराजेंना अडगळीत टाकल्याचा राग तर आहेच. मात्र त्या भळभळत्या जखमेवर जसवंतसिंगांचे चिरंजीव मानवेंद्र यांना भाजपमध्ये घेऊन महाशक्तीने मीठ चोळले आहे. त्यामुळे वसुंधराराजेही आतून पाडापाडीचे राजकारण करतील. त्याचा फटका भाजपला राजस्थानात बसू शकतो. रमणसिंग हे तर राजकीय पटलावरूनच गायब झाले आहेत. त्यांची अस्वस्थताही ते दाखवून देतीलच. भाजप अटलजी, आडवाणींच्या काळात शिस्तबद्ध पक्ष होता. त्या काळात संघटन सचिव पदावर काम करणारी व्यक्ती ही सर्वात शक्तीशाली मानली जात होती. नागपूरला विचारून निर्णय घेतले जात होते. आता हे सगळे इतिहासजमा झाले आहे. त्यामुळे हम दोची लढाई त्या दोघांनाच लढू द्या, असा सूर त्या पक्षात आणि परिवारात आहे. ज्या अहंकाराने महाशक्तीने राजकारण केले तो अहंकारच त्यांना सध्या निवडणुकीत नाकीनऊ आणत आहे.

सुरत, इंदूर पॅटर्न…

काहीही करून सत्ता हस्तगत करा हाच ‘गुजरात पॅटर्न’चा मूलमंत्र आहे. त्याचे नवनवे अनुभव घेत देशाचे हात पोळून निघत आहेत. लोकसभेत मोदी जिंकले तर यापुढे देशात निवडणुकाच होणार नाहीत, अशी टीका विरोधक करतात. राजकीय टीका म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखी स्थिती नाही, हे सुरतपाठोपाठ इंदूरमधल्या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. सुरतचे कॉंग्रेस उमेदवार नीलेश पुंभाणी यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून तिथले भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे ‘चाणक्य’ वगैरे ठरले होते. लोकशाहीचा गळा सुरतमध्ये घोटल्यानंतर आता हाच पॅटर्न मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही राबविण्यात आला. तिथले कॉंग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडण्यात आले. तिथले ‘चाणक्य’ ठरले शिवराजसिंगांचे कट्टर विरोधक पैलाश विजयवर्गीय. कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी रणांगणातून पळ काढला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ‘चार सौ पार’चे खाते दोन जागांनी अशा प्रकारे उघडले. हा सगळाच प्रकार देशाच्या लोकशाही तंत्राला धक्का देणारा आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या डोळ्यांतदेखील अंजन घालणारा आहे. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस उमेदवार कोणी ठरविले. त्याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी. कॉंग्रेस जोपर्यंत आपले घरभेदी शोधून त्यांच्यावर कारवाई करणार नाही, तोपर्यंत लोकशाहीचा गळा घोटणारे हे प्रकार असेच सुरू राहणार.

‘मोदी का परिवार’मध्ये रेवण्णा

लोकसभा निवडणुकीत ‘मोदी का परिवार’ म्हणून एकच गलका सुरू आहे. मोदींच्या या परिवारात तीन हजार महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ बनविण्याचे हीन कृत्य करणारे प्रज्ज्वल रेवण्णा व त्याचे वडील यांना सन्मानाने सामील केले गेले. वास्तविक, प्रज्ज्वल यांचे प्रताप भाजप नेतृत्वाला माहीत नव्हते असेही नाही. रेवण्णा यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱया देवराज गौडा या नेत्याने प्रज्ज्वल रेवण्णाचा सगळा तपशील प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यापर्यंत पोहोचविला. त्यानंतर दिल्लीपर्यंत पोहोचवला. मात्र या कृष्णकृत्याकडे भाजपने साफ दुर्लक्ष केले. कर्नाटकात कॉंग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर काहीही करून लोकसभेत चांगली कामगिरी व्हावी आणि वोक्कलिंग समाजाची व्होट बॅंक भाजपकडे यावी यासाठी दिल्लीतील महाशक्तीने देवगौडांच्या वादग्रस्त परिवारासाठी गालिचे अंथरले. रेवण्णांच्या घरातील काम करणाऱया महिला व ड्रायव्हरने धाडस दाखवून हे प्रकरण पुढे नेले. देवराज गौडांनी राजकीय उद्देशाने का होईना, या प्रकरणाचा पाठपुरावा केला. मात्र भाजप नेतृत्वाने हे प्रकरण पूर्णपणे दडपून टाकले. आता अनेकांचे शोषण करणारा रेवण्णा विदेशात पळून गेल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई त्यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने केली आहे. त्यानंतरही भाजपने याप्रकरणी धरलेली मौनाची गुळणी काही बाहेर टाकलेली नाही. सत्तेसाठी आणि व्होट बॅंकेसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हेच भाजपने यातून दाखवून दिले आहे. मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदींप्रमाणेच प्रज्ज्वल रेवण्णा विदेशातही महाशक्तीच्या रूपाने सुखेनैव जीवन व्यतीत करेलच!