जळगावकरांनो, घरातच बसा! पारा 46.7 अंशावर गेला

सूर्यनारायण कोपले असून बारा कळ्यांनी आग ओकत आहेत. जळगावात पारा 46.7 अंशावरा गेला असून उष्माघाताच्या भीतीने जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. रोजगार हमीवर काम करणार्‍या मजुरांनी उन्हात काम करू नये, खासगी कोचिंग क्लासेसची वेळही सकाळी 10 वाजेपर्यंतच ठेवण्यात यावी तसेच लहान मुलांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घराबाहेर खेळण्यास पाठवू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण राज्यात सध्या उष्णतेच्या प्रखर लाटेने कहर केला आहे. पारा चाळिशीपार गेल्याने काहिली वाढली आहे. खान्देशात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान शनिवारी 46.7 अंशावर गेले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 25 मे पासून 3 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे. 1973 च्या कलम 144 अन्वये हा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

असा आहे आदेश

कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही तसेच अंगमेहनत करणार्‍या कामगारांनी उन्हात काम करू नये.

अत्यावश्यक असेल तर कामाच्या ठिकाणी कामगारांना सावलीसाठी शेड तयार करण्यात यावे. त्याठिकाणी कूलर, पंख्यांची सोय करण्याची जबाबदारी मालकाची असेल. याबाबत तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, पोलीस विभागाकडे करता येईल.

खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंतच आपले क्लासेस चालवावेत. सकाळी 10 ते 5 या वेळेत क्लासेस चालवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे, कूलरची व्यवस्था करावी.

आरोग्य विभागाच्या सूचना

पालकांनी आपल्या दहा वर्षाखालील बालकांना सकाळी 10 ते 6 या वेळेत खेळण्यासाठी उन्हात जाऊ देऊ नये.
दैनंदिन काम असल्यास रुमाल, टोपी, छत्री अशी आवश्यक खबरदारी घेऊन बाहेर पडावे. मुबलक पाणी प्यावे.
उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत.

उष्माघाताचा त्रास होत असल्यास…

उष्माघाताचा त्रास होत असल्यास लगेच सावलीमध्ये यावे.
पायाखाली उशी ठेवून आडवे झोपण्यास सांगावे.
वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत, डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.

लोडशेडिंगमुळे ताप वाढला

जळगावकर अगोदरच उष्णतेच्या प्रखर लाटेत भाजून निघत आहेत. त्यात लोडशेडिंगने नागरिकांचा ताप आणखी वाढवला आहे. जिल्ह्यात सध्या अनिर्बंध लोडशेडिंग करण्यात येत आहे. लोडशेडिंग करण्याच्या कोणत्याही वेळा निश्चित नाहीत. ज्यावेळी तापमान अतितीव्र असते म्हणजे भर दुपारी हमखास वीज गायब होते. त्यामुळे लहान मुले, वृद्धांचे हाल हाल होत आहेत. काही भागात तर लोडशेडिंगच्या नावाखाली मध्यरात्री वीज घालवण्यात येते. ग्रामीण भागात वीज कधी असते, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. कारण वीज केव्हा येते आणि केव्हा जाते याचा काहीही भरवसा नाही.

दिवसरात्र काहिली काहिली

एरवी दिवसभर तापमानाचा पारा वाढल्याने रात्रीपर्यंत काही प्रमाणात उष्णतामान कमी होऊन काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, कमाल तापमानाशी आता किमान तापमानही स्पर्धा करू लागले आहे. रात्रीच्यावेळी किमान तापमानात मोठी घट होताना दिसत नाही. त्यामुळे दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उष्णता जाणवत आहे. दिवसभर कमाल तापमान जवळपास 45 अंशांवर पोहोचले आहे. ‘वेलनेस वेदर’च्या नोंदीनुसार शनिवारी जळगावचे कमाल तापमान 46.7 होते. उत्तरेकडून वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे पारा वाढला आहे. हे उष्ण वारे कोरडे असल्याने किमान तापमानात घट होत नसून रात्रीही उष्णता कायम राहते. शिवाय गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री ढगाळ वातावरण असल्याने त्यातील उष्णता उत्सर्जित होत नाही. त्यामुळे आर्द्रता वाढून उष्णता अधिक जाणवते.