नेपाळ हरले, पण क्रिकेट जिंकले! दक्षिण आफ्रिका हरता हरता जिंकली

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या लढतीत अखेर दक्षिण आफ्रिकेने कसाबसा पराभव टाळत नेपाळसारख्या लिंबूटिंबू संघाला चमत्कार घडविण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेचा संघ अक्षरशः हरता हरता जिंकला. नेपाळचा निसटता पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थाने क्रिकेट जिंकले असा थरारक सामना शनिवारी सकाळी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘ड’ गटात बघायला मिळाला. नेपाळची आघाडीची फळी कापून काढणारा दक्षिण आफ्रिकेचा तबरैझ शम्सी या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला.

नेपाळला अखेरच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने ओटनिल बार्टमनकडे चेंडू सोपविला. बार्टमनने पहिल्या दोन चेंडूंवर नेपाळच्या गुलशन झा याला चकवले, मात्र गुलशनने तिसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा बीपी वाढविला. पुढच्या चेंडूवर गुलशनला 2 धावा मिळाल्या व नेपाळच्या पाठीराख्यांनी अक्षरशः मैदान डोक्यावर घेतले. पाचवा चेंडू पुन्हा निर्धाव गेल्याने नेपाळवरील दडपण वाढले. अखेरच्या चेंडूवर सामना टाय करण्यासाठी एका धावेची, तर जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती. मात्र, बॉल-बॅटची गाठ न पडल्याने चेंडू यष्टीमागे क्विंटन डि कॉककडे गेला. त्याने चपळाईने क्लासेनकडे चेंडू फेकला अन् नेपाळचा फलंदाज धावबाद झाल्याने केवळ एका धावेना का होईना, पण दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून स्वतःची इभ्रत राखली, मात्र हातातोंडाशी आलेल्या ऐतिहासिक विजयाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने नेपाळच्या खेळाडूंचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा पुरता हिरमोड झाला.

नेपाळने दक्षिण आफ्रिकेला 7 बाद 115 धावांवर रोखण्याचा पराक्रम करून दाखवला. त्यानंतर कुशल भुर्तेल (13), आसिफ शेख (47) आणि अली शाह (27) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा प्रतिकार करीत नेपाळच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र अखेरच्या क्षणाचे दडपण हताळण्यात अपयश आल्याने नेपाळला ऐतिहासिक विजयाने हुलकावणी दिली. दक्षिण आफ्रिकेकडून तबरैझ शम्सीने 19 धावांत 4 विकेट टिपत असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. एन्रीच नॉर्किया व एडेन मार्करम यांना 1-1 विकेट मिळाली.

त्याआधी, नेपाळने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. दीपेंद्र सिंह ऐरी व कुशल भुर्तेले यांनी अफलातून गोलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेच्या बलाढय़ फलंदाजीला सुरुंग लावला. द. आफ्रिकेकडून रिझा हेंड्रिक्स (43) व ट्रिस्टन स्टब्स (27) यांनाच काय तो नेपाळच्या गोलंदाजीचा सामना करता आला. क्विंटन डि कॉक (10) व एडन मार्करम (15) हे इतर दोन फलंदाज दुहेरी धावा करू शकले, मात्र नेपाळने या संघाला 115 धावांवर रोखण्याचा पराक्रम केला. भुर्तेलेने 4, तर दीपेंद्र सिंहने 3 फलंदाज बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला लगाम घातला.

दक्षिण आफ्रिकेचा एका धावेने पाचव्यांदा विजय

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक पाच वेळा एका धावेने निसटते विजय मिळविलेले आहेत. न्यूझीलंड, आयर्लंड, हिंदुस्थान, इंग्लंड व केनिया यांनी प्रत्येकी दोन वेळा हा पराक्रम केलेला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा एका धावेने विजय मिळविला. याआधी त्यांनी 2009 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला एका धावेने पराभूत केले होते.