WI vs SA T20 : वेस्ट इंडीजची विजयी सलामी

यजमान वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू झालेल्या टी -20 मालिकेतील पहिल्या सामन्यात जोरदार विजयी सलामी दिली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही विंडीजच्या खेळाडूंनी विजयाची किमया साधताना 29 धावांनी विजय मिळवत तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

टी -20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून विंडीज- आफ्रिकेसाठी या मालिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने या मालिकांसाठी ते उपलब्ध नाहीत. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम आणि यष्टिरक्षक फलंदाज हेन्रीक क्लासन सनरायझर्स हैदराबादकडून, तर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार रोवमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहेत. त्यामुळे दोन्ही संघ समान ताकदीचेच होते.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 175 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून प्रभारी कर्णधार ब्रेंडन किंगने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. त्याने 45 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. तसे कायल मायर्सने 34 आणि रोस्टन चेस 32 धावांचे योगदान दिले. आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन आणि अँडिल पहलुकवायोने प्रत्येकी 3 विकेट टिपले.

176 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.5 षटकांत 147 धावांतच आटोपला. रिझा हेंड्रिक्सने 51 चेंडूत 87 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली, परंतु त्याला अन्य कोणाकडूनही फारशी साथ मिळाली नाही. त्याच्याव्यतिरिक्त केवळ मॅथ्यू ब्रित्झके (19) आणि रस्सी वॅन डर घुसेन (17) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.  वेस्ट इंडीजकडून मॅथ्यू पर्ह्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर ओबेड मकॉयने 2 विकेट घेतल्या.