भाजप नेते बीएस येडियुरप्पा माजी मुख्यमंत्री असल्यामुळे कुठे जाणार नाहीत या कारणास्तव कर्नाटक उच्च न्यायालयाने पोक्सो प्रकरणात त्यांच्या अटकेला स्थगिती दिल्याबद्दल पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे तर अगदी निवडक न्यायदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे भाजपचे नेते असलेल्या येडियुरप्पा यांच्या अटकेला स्थगिती मिळते आणि दुसरीकडे आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व झारखंडचे माजी मुख्यमंत्री झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन हे तुलनेने अगदीच किरकोळ आरोपांखाली तुरुंगात टाकले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कर्नाटक हायकोर्टाने पोक्सो प्रकरणात भाजपच्या बीएस येडियुरप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. आरोपी माजी मुख्यमंत्री असल्यामुळे कोठेही जाणार नाही असे कोर्टाने सांगणे हे हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या वागणुकीच्या अगदी विरुद्ध आहे. ते दोघे तर किती महिने तुरुंगात गजाआड आहेत, असे मेहबूबा यांनी म्हटले आहे.