शाब्बास शाहबाज! हैदराबाद तिसऱ्यांदा  फायनलमध्ये, राजस्थानचा पुन्हा निराशाजनक खेळ

जाँबाज हैदराबाद… शाब्बास शाहबाज… शाहबाज अहमदच्या प्रभावी फिरकीमुळे हैदराबादने क्वॉलिफायर-2ची झुंज सहज जिंकताना राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. आता रविवारी आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने असतील.

हैदराबादच्या 176 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला आजही जोस बटलरची उणीव भासली. सलामीवीर टॉम कोहलरने आजही निराशा केली. मग यशस्वी जैसवालने 21 चेंडूंत 42 धावा चोपून काढत राजस्थानला सामन्यात ठेवले. पण शाहबाजच्या फिरकीने जैसवालचा झंझावात रोखून सारा सामनाच फिरवला.

त्याआधी ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर आघाडीवीर अभिषेक शर्मा (12), राहुल त्रिपाठी (37) आणि एडन मार्करम (1) हे तिघे बाद झाल्यामुळे हैदराबाद अडचणीत सापडला होता; पण हेन्रिक क्लासनने 34 चेंडूंत 4 षटकार खेचत केलेल्या 50 धावांच्या खेळीने हैदराबादला पावणे दोनशे ही समाधानकारक आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. राहुल त्रिपाठीनेही 15 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांचा पाऊस पाडत 37 धावा ठोकल्या. मात्र नेहमीच सुस्साट सलामी देणाऱ्या ट्रव्हिस हेडने 28 चेंडूंत केवळ 34 धावा केल्या, पण त्याची ही खेळीसुद्धा हैदराबादसाठी फायद्याची ठरली. तळाला शाहबाज अहमदने 18 चेंडूंत 18 धावा करून संघाला 175 पर्यंत नेले. त्याने क्लासनसह केलेली 43 धावांची भागी निर्णायक ठरली.

अन्यथा हैदराबाद 150 च्या आतच घुटमळला असता. बोल्ट आणि आवेश खानने 3-3 विकेट घेत हैदराबादला रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ लढवली,  त्यांना त्यात यशही लाभले.

शाहबाजची कमाल, अभिषेकची धमाल

जैसवाल बाद होताच संजू सॅमसनवर दबाव वाढला आणि त्याचा अडथळा अभिषेक शर्माने दूर करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. सामन्याला कलाटणी देणारे सामन्यातील 12व्या षटकाने राजस्थानचेच बारा वाजवले. शाहबाजने आपल्या एकाच षटकात रियान पराग (6) आणि रविचंद्रन अश्विन (0) यांना बाद करून राजस्थानचे पंबरडेच मोडले. पुढे अभिषेक शर्माने शिमरॉन हेटमायरचा त्रिफळा उडवून राजस्थानच्या अंतिम फेरी प्रवेशाचे स्वप्नही उडवले. त्यानंतर ध्रुव जुरेलने एकहाती 56 धावांची घणाघाती खेळी केली, अखेर हैदराबादने राजस्थानला 7 बाद 139 धावांवर रोखत आपल्या अंतिम फेरी प्रवेशावरही शिक्कामोर्तब केले. शाहबाजने 23 धावांत 3, तर अभिषेकने 24 धावांत 2 विकेट घेतल्या. याच फिरकीने आज राजस्थानची दांडी उडवली.

तिसऱ्यांदा नव्हे चौथ्यांदा फायनलमध्ये

सनरायझर्स हैदराबादने तब्बल सहा वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. 2018 साली ते अंतिम फेरीत पोहोचले, मात्र चेन्नईने त्यांना ट्रॉफी जिंकू दिली नाही. त्याआधी 2016 सालीही ते अंतिम फेरीत पोहोचले आणि आपले पहिलेवहिले जेतेपद पटकावले. या आधी हैदराबादचे नाव डेक्कन चार्जर्स होते आणि या संघाने 2009 साली फायनलमध्ये प्रवेश करताना अजिंक्यपद संपादले होते. म्हणजेच सनरायझर्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असली तरी हैदराबाद चौथ्यांदा फायनल खेळणार आहे.