पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र काही थांबेना, आज पुन्हा एक आत्महत्या झाली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडेन, असा इशारा आज पंकजा मुंडे यांनी चिंचवडीतील पोपट वायबसे यांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर समर्थकांना दिला.
पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने आष्टी तालुक्यातील चिंचवडी येथे पोपट वायबसे या तरुणाने आत्महत्या केली होती. पंकजा मुंडे यांनी रविवारी चिंचवडी येथे जाऊन वायबसे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांची भेट घेत असताना पंकजा मुंडेंचे अश्रू अनावर झाले. यावेळी त्या म्हणाल्या, आता आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, आत्महत्या थांबल्या नाहीत तर मी राजकारण सोडेन, आगामी शंभर दिवस माझ्यासाठी द्या, हे सगळे चित्र बदलून टाकेन. तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवा आहे. तर मलाही हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. आत्महत्येच्या सत्राने मी अस्वस्थ झाली आहे. कार्यकर्त्यांना मी यंत्रासारखे वापरले नाही. परिवारापेक्षा जास्त जवळचे समजते. कार्यकर्त्यांनी खूप जीव लावला मला. आज मी पहिल्यांदा कमकुवत झाली आहे. आज मला अपराध्यासारखं वाटतंय. मी या कार्यकर्त्यांना काहीच देऊ शकले नाही. पराभव इंदिरा गांधींचा झाला, मुंडे साहेबांचा झाला. धीर सोडू नका, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.