हिंदुस्थानी क्रिकेटचा स्वदेशीचा नारा? विदेशी नव्हे देशी प्रशिक्षकालाच बीसीसीआयच्या पसंतीचे संकेत

एकीकडे हिंदुस्थानचे काही दिग्गज खेळाडू हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास उत्सुक आहेत तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दिग्गज रिकी पॉण्टिंग, जस्टीन लँगर यांनी आपला नकार दर्शवल्याचे वृत्त समोर आले. मात्र बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आपण टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही ऑस्ट्रेलियन तसेच विदेशी खेळाडूच्या संपका&त नसल्याचे स्पष्ट करत यंदाचा प्रशिक्षक स्वदेशीच असेल, असे संकेत दिले आहे. 27 मेपर्यंत प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची डेडलाईन ठेवण्यात आली असून त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी कोण उत्सुक आहे ते कळू शकेल.

हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआयकडून नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्जही मागवले आहेत. नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू होताच गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नावे समोर आली आहेत. त्याचबरोबर  रिकी पॉण्टिंग, जस्टीन लँगर आणि अँडी फ्लॉवर यांनासुद्धा प्रशिक्षकाची ऑफर दिली होती आणि त्यांनी त्यास नकार दिल्याचे समोर आले, मात्र हे वृत्त समोर येताच सचिव जय शहा यांनी हे वृत्त बिनबुडाचे असून आपण कोणत्याही विदेशी खेळाडूच्या संपका&त नसल्याचे सांगितले आणि आपण कोणालाही ऑफर दिली नसल्याचे सांगून पॉण्टिंग-लँगर-फ्लॉवर यांची पोलखोल केली आहे.

पॉण्टिंग-लँगरची वेगळी कारणे

मला राष्ट्रीय संघाचा वरिष्ठ प्रशिक्षक व्हायला आवडेल, परंतु माझ्या आयुष्यात इतर गोष्टी आहेत आणि मला घरी थोडा वेळ घालवायचा आहे, असे रिकी पॉण्टिंगने म्हटले आहे. तसेच आयपीएलमध्ये तुमच्यावर प्रेशर आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल त्यापेक्षा पैकपटीने दबाव टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर असतो, अशी मला के. एल. राहुलने आधीच कल्पना दिल्याचे वक्तव्य लँगर यांनी केले होते.

बीसीसीआय ऑस्ट्रेलियन्सच्या संपर्कात नाही – शहा

मी किंवा बीसीसीआयने अद्याप कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूशी बोलणी केलेली नाही किंवा त्यांना कसलीही ऑफर दिलेली नाही. काही माध्यमे आणि चॅनेलमध्ये सुरू असलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची निवड करणे आमच्यासाठी एक काळजीपूर्वक प्रक्रिया आहे. ज्या खेळाडूंना हिंदुस्थानी क्रिकेटची माहिती आहे, ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे अशाच खेळाडूला संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्याचा आमचा कल असेल, असे जय शहा यांनी स्पष्ट केले.