प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्र्ााने वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री बंगळुरू महामार्गाशेजारी पुलाची शिरोलीतील (सांगली फाटा) बुधले मंगल कार्यालय येथे घडली. खून झालेला तरुण हा पाडळी (ता. हातकणंगले) येथील होता.
संकेत संदीप खामकर (वय 19, रा. पाडळी, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. संकेत याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता. संकेत मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला घेऊन मंगल कार्यालयात आल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईकांमध्ये वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्र्ााने हल्ला करून त्यास ठार मारले. यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत असून, तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असल्याचे समजते.
खुनाची ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तरुणावर हल्ला होत होता. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रालाही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी देत त्याचा मोबाईलही काढून घेतला. त्यामुळे घाबरलेल्या संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते. संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता. संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते. तो लेखी, शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता.
आजी व चुलत्याने केला होता सांभाळ
मयत संकेत पाच वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर संकेतची आईही संकेतला सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ आजी व चुलत्यांनी केला होता. संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी तपास करीत आहेत.