‘डीप क्लीनिंग’मध्ये 239 टन कचरा, राडारोडा, 336 किमी रस्ते सफाई

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेमध्ये आज एकाच दिवसात तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडा, 30 मेट्रिक टन मोठय़ा टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱयाचे संकलन करण्यात आले, तर तब्बल 336 किमी रस्त्यांची स्वच्छताही करण्यात आली. हे काम करण्यासाठी सकाळपासून पालिकेचे तब्बल 1 हजार 543 कर्मचारी अधिकाऱयांसोबत रस्त्यावर उतरले होते. 196 संयंत्राच्या सहाय्याने हे काम करण्यात आले.

मुंबईत गेल्या 27 आठवडय़ांपासून ‘डीप क्लीनिंग’ मोहीम राबवण्यात येत आहे. तर सध्या पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत सध्या ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला होती. पी दक्षिण विभागात कृष्णवाटिका मंदिर परिसर, टी विभागात मुलुंड पश्चिम येथील डॉ. आर. आर. मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली (पश्चिम) येथे मिलाप सिनेमागृह परिसर, स्वामी विवेकानंद मार्ग, ‘एम’ पूर्व विभागात वामन तुकाराम पाटील मार्ग, ‘के’ पश्चिम विभागात व्ही. एम. मार्ग, ‘एल’ विभागात कुर्ला पूर्व येथे हशू आडवाणी चौक, शिवसृष्टी मार्ग, ‘आर’ उत्तर विभागात दहिसर पूर्व येथे गणपत पाटील नगर आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.