कंबोडियातून 360 हिंदुस्थानींची सुटका; भरमसाट पगाराचे आमिष दाखवून एजंटने फसवले

भरमसाट पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेल्या 360 हिंदुस्थानी नागरिकांची कंबोडियातून सुटका करण्यात आली आहे. हिंदुस्थानी दूतावासाने गुरुवारी ही माहिती दिली. फसवणूक करण्यात आलेल्या या हिंदुस्थानी नागरिकांकडून सायबर फसवणुकीसारखे काम केले जात होते. 60 नागरिकांची पहिली तुकडी हिंदुस्थानात दाखल झाली आहे. उर्वरित लोकांची प्रवासी कागदपत्रे आणि इतर गोष्टी तपासल्या जात असून त्यांनाही लवकरच घरी आणले जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केलेल्या एजंटच्या मदतीनेच नोकऱया शोधण्याचा सल्ला अॅडव्हायझरीमध्ये देण्यात आला आहे. पर्यटक व्हिसावर नोकरी शोधू इच्छिणाऱया लोकांनी एजंटपासून दूर राहावे, त्यांच्याकडून पर्यटकांची फसवणूक केली जाऊ शकते, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

कंबोडियातील मानवी तस्करीच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या 300 हिंदुस्थानींनी बंड केले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी अनेकांना अटक केली. यातील सुमारे दीडशे लोक वर्षभरापासून तेथे अडकले होते, असे पोलिसांनी सांगितले. चिनी हँडलर्स या नागरिकांना सायबर गुह्यांमध्ये आणि पॉन्झी घोटाळ्यांमध्ये अडकवायचे, असेही पोलीस म्हणाले.