ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 55 वाघ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात 55 पट्टेदार वाघ आणि 17 बिबटे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रकल्पाच्या वतीने बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम राबवण्यात आला.

यात निसर्गप्रेमींनी मचानावर बसून प्राणीगणना केली. यात ही आकडेवारी समोर आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भारतातील विविध राज्यांतील निसर्गप्रेमींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बफर क्षेत्रातील एकूण 6 वनपरिक्षेत्रांत 79 मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण 160 निसर्गप्रेमींनी बसून प्राणीगणना केली. याशिवाय कोर विभागातील 5 वनपरिक्षेत्रांतील एकूण 76 मचाणींवर बसून वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली.

या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात 26 वाघांची व 8 बिबट्यांची नोंद झाली तर कोर क्षेत्रात 29 वाघांची व 9 बिबट्यांची नोंद करण्यात आली.