मेहुल चोक्सी म्हणतोय, गुन्हेगारी खटल्यासाठी देश सोडला नाही 

फौजदारी खटला टाळण्यासाठी हिंदुस्थान सोडला नाही. माझा पासपोर्ट सस्पेंड आहे. त्यामुळे मी हिंदुस्थानात परत येऊ शकत नाही, असा उफराटा सवाल पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने केला आहे. मेहुल चोक्सी जानेवारी 2018 मध्ये परदेशात पळून गेला होता. त्यानंतर 2017 मध्येच त्याने अँटिग्वा-बारबुडाचे नागरिकत्व घेतल्याचे उघड झाले होते. म्हणजेच वर्षभरापूर्वीच त्याने हे नागरिकत्व घेतले होते. मेहुल चोक्सीने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत हिंदुस्थानात येण्यास नकार दिला आहे. मेहुल चोक्सी आणि गीतांजली जेम्सचे माजी अध्यक्ष नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत 14 हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बँक अधिकाऱयांच्या संगनमताने 2011 ते 2018 दरम्यान बनावट लेटर्स ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे ही रक्कम उकळली.