स्फोट… काचांचे ढीग आणि रक्तबंबाळ डोंबिवलीकर

>> आकाश गायकवाड

सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली शहराला आता स्फोटांची नगरी म्हणूनही ओळखले जात आहे. डोंबिवली शहरातील एमआयडीसी भाग आणि त्यातील स्फोटांमुळे सातत्याने हादरणारी डोंबिवली हे चित्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसत असून स्फोटांची मालिका अजूनही थांबलेली नाही. आठ वर्षांपूर्वी प्रोबेस कंपनीतील स्फोटात हादरलेली डोंबिवली अद्यापही सावरलेली नाही. तोच पुन्हा डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण स्फोट होऊन 11 ठार तर 64 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्फोट.. काचांचे ढीग आणि रक्तबंबाळ डोंबिवलीकर असेच चित्र सध्या दिसत आहे. सर्व कायद्यांना धाब्यावर बसवणारे हानिकारक कारखाने यामुळे रहिवासी कायमच भीतीच्या सावटाखाली आहेत.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात धूर ओकणाऱ्या कंपन्या, उघडे नाले, त्यातून पसरलेली दुर्गंधी अशा समस्या एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भोगाव्या लागत आहेत, मात्र 26 मे 2016 रोजी प्रोबेस या कंपनीत झालेल्या सिलिंडर स्फोटाने संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला होता. या स्फोटात 12 जणांना जीव गमवावा लागला होता. तर सुमारे २०० जण जखमी झाले होते. स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तोच गुरुवारी एमआयडीसी अमुदान केमिकल कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाला.

अमुदानच्या भीषण स्फोटाची तीव्रता सर्वाधिक होती. मात्र ही संकटाची नांदी ठरली असून त्यानंतरही ही स्फोटांची मालिका सुरूच राहिली. कमी अधिक प्रमाणात हे स्फोट धोकादायक असल्याचे दिसत असले तरी या हादऱ्यांमुळे डोंबिवलीतील एमआयडीसी परिसर हा सातत्याने भीतीच्या छायेत आहे.

Dombivli blast – अजूनही 10 जण बेपत्ता; 5 बॅग भरून मृतांचे अवशेष आढळले, कुटुंबीयांची घालमेल

प्रोबेस कंपनीचे नुकसानग्रस्त मोबदल्याच्या प्रतीक्षेत

26 मे 2016 रोजी एमआयडीसी फेज 2 मधील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. या घटनेची तीव्रता अधिक असल्याकारणाने कंपनीत काम करणाऱ्या 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या 215 जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. त्या स्फोटांमुळे जवळपास 3 ते 5 किलोमीटर परिसरात नुकसान झाले. साधारणपणे 7 कोटी 43 लाख 70 हजार 990 रुपये नुकसानीचा अहवाल आहे. मात्र त्या घटनेला आठ वर्षे होऊनही अद्याप नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही.

अमुदानच्या बॉयलरला परवानगीच नव्हती; एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना कुणाचा आशीर्वाद?