Dombivli blast – अजूनही 10 जण बेपत्ता; 5 बॅग भरून मृतांचे अवशेष आढळले, कुटुंबीयांची घालमेल

डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-2मधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू आहे. शोधकार्यादरम्यान उद्ध्वस्त अवशेषांमध्ये शुक्रवारी आणखी तीन मृतदेह सापडले.

स्फोटाने बेचिराख झालेल्या कंपन्यांच्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरले आहेत. हे तुकडे एकाच मृतदेहाचे आहेत की नाही याचा मेळ लावणेही अवघड होऊन बसले आहे. बेपत्ता असलेल्या कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दिवसभर थांबून होते. आपल्या आप्तांच्या शोधाकडे त्यांचे डोळे लागले होते. मृतदेहाचे मिळतील ते भाग जमा करून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत. आतापर्यंत 5 बॅगा भरून मृतांचे अवशेष आढळून आले आहेत. रुग्णालयाकडून डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे बेपत्ता कामगारांची ओळख पटवताना नातेवाईकांची होत असलेली घालमेल काळीज पिळवटून टाकणारी होती.

मंगळसूत्र, अंगठी दिसताच आक्रोश

अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटात तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेली रिद्धी अमित खानविलकर या महिलेचा मृत्यू झाला. मात्र त्यांची ओळख काही केल्या पटत नव्हती. अखेर शोध घेत असलेल्या त्यांच्या पतीला हातातील अंगठी आणि गळ्यातील मंगळसूत्र दिसले आणि त्यांनी हंबरडाच फोडला. काळीज पिळवटणारे हे दृश्य पाहून शास्त्रीनगर रुग्णालय परिसर हेलावून गेला.

डोक्यावर अक्षता पडल्याच नाहीत

अमुदान कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी करणारी रोहिणी कदम (रा. आजदेपाडा) ही दगावली आहे. रोहिणी ही 26 वर्षांची असून तीदेखील नुकतीच या कंपनीमध्ये कामाला लागली होती. ती मूळची श्रीवर्धनमधील कोलमांडले गावातील आहे. तिच्या घरी मोठी बहीण आणि एक भाऊ असा परिवार असून तिच्या लग्नासाठी स्थळही शोधण्यासाठी घरातील मंडळींनी सुरू केले होते, पण तिच्या डोक्यावर अक्षता पडल्याच नाहीत.

अमुदानच्या बॉयलरला परवानगीच नव्हती; एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना कुणाचा आशीर्वाद?

आठ तास सतत फोन

अमुदान कंपनी लगतच्या सप्तवर्ण कलर कंपनीत काम करणारे मशीन ऑपरेटर राकेश राजपूत हेही स्फोटानंतर बेपत्ता होते. आठ तास कुटुंबीय फोन करत होते. मात्र ते मोबाईलला प्रतिसाद देत नव्हते. आठ तासांनंतरही त्यांचा शोध लागला नव्हता. राजपूत कुटुंब हे सोनारपाडा गावात राहायचे. ते मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. 15 वर्षांपासून राकेश हा या कंपनीत नोकरी करत होते. त्यांना पत्नी पाच मुली आणि मुलगा असा परिवार आहे.