अमुदानच्या बॉयलरला परवानगीच नव्हती; एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना कुणाचा आशीर्वाद?

डोंबिवलीत केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा समोर आला आहे. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरसाठी कामगार विभागाची परवानगी घेतली नव्हती अशी चर्चा आहे. तर स्फोट झालेला रिअॅक्टर औद्योगिक सुरक्षा विभागाची परवानगी घेऊन बसवला होता. मात्र रिअॅक्टरमध्ये तांत्रिक दोष असल्यामुळेच तो फुटला आणि निष्पाप 11 जणांचे बळी गेले. स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षा आणि कामगार विभाग परवानगीबाबत परस्परांकडे बोट करत असून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे एमआयडीसीतील बेकायदा कंपन्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद, असा संतप्त सवाल डोंबिवलीकर विचारत आहेत.

अमुदान कंपनीतील रिअॅक्टरसह बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती. मात्र या बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र याबाबत कोणतीही कागदपत्रे सापडत नसल्याने अधिकारी अधिकृत माहिती देण्यास तयार नाहीत. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये रिअॅक्टरचा स्फोट होऊन झालेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून मृतदेहाचे मिळतील ते भाग जमा करून रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत. त्यामुळे आता मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीच एमआयडीसीमधील आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले होते.

या दुर्घटनेला गद्दारांचे सरकारच जबाबदार! अंबादास दानवेंचा आरोप

एमआयडीसी येथील अमुदान कंपनीत रिअॅक्टरमध्ये स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेला कंपनीचे व्यवस्थापन तर जबाबदार आहेच मात्र गद्दारांचे सरकारही 11 निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. दुर्घटनास्थळी आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसदेखील केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, कंपन्यांमध्ये अकुशल कामगार व जुने रिअॅक्टर वापरामुळे अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे बॉयलरप्रमाणे रिअॅक्टरवर धोरण आणण्याची गरज आहे. याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांच्यासमोर सत्यम डोअर कंपनीचे मालक अविनाश गमरे यांनी ढसाढसा रडत आपली व्यथा मांडली. नुकतेच त्यांनी दोन कोटी रुपये कर्ज घेऊन नवीन कंपनी डोंबिवली एमआयडीसीमध्ये शिफ्ट केली होती. मात्र अमुदानच्या स्फोटात त्यांची कंपनीही खाक झाली. बेकायदा काम करणाऱ्या कारखान्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे गमरे म्हणाले. दानवे यांनी त्यांचे सांत्वन करत सरकारद्वारे त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, रमेश पाटील, प्रतीक पाटील, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.