नाशिकमधील ICICI home finance वर दरोडा; लॉकर्स फोडून 222 खातेदारांचे सोन्याचे दागिने लुटले

नाशिकच्या ICICI होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा पडला आहे. चोरट्यांनी 222 खातदेरांची लॉकर्स फोडून तब्बल 5 कोटी रुपयांचे दागिने पळवले आहेत. नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकात ICICI होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय आहे. मात्र, हा परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात सतत लोकांची वर्दळ असते. तरीही ही दरोड्याची घटना घडली आहे.

ही नाशिकमधील मोठा दरोडा मानला जात आहे. चोरट्यांनी तब्बल 222 खातेदारांची लॉकर्स फोडून त्यामधील दागिने लांबवले आहेत. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. दोन चोर शुक्रवारी मध्यरात्री पीपीई किट घालून आले. त्यांनी अवघ्या 15 मिनिटांत 4 कोटी 92 लाखांचे तारण दागिने लंपास केले. हा दरोडा पडला तेव्हा पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक होते. मात्र, चोर मागच्या खिडकीतून पळून गेले. गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या चोरीप्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीचा पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी ICICI होम फायनान्सच्या कार्यालयात शिरले कसे , असा सवाल निर्माण होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दरोडेखोरांचे चेहरे दिसत आहेत. त्याआधारे आता सरकारवाडा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे खासगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.