चेन्नईने रोखला पंजाबचा विजयरथ; जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीने पंजाबविरुद्ध पराभवाची मालिका खंडित

चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये लागोपाठ पाच पराभवांनंतर अखेर तब्बल 1115 दिवसांनी पंजाब किंग्जचा विजयरथ रोखला. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नईने याआधी 16 एप्रिल 2021 रोजी पंजाबला हरविले होते. रविवारी धर्मशाळा मैदानावर झालेल्या लढतीत चेन्नईने 167 या असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना 28 धावांनी विजयाला गवसणी घातली अन् आयपीएलच्या गुणतक्त्यात तिसऱया स्थानी झेप घेतली. अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जाडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला.

चेन्नईकडून मिळालेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव 9 बाद 139 धावसंख्येपर्यंतच मर्यादित राहिला. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने दुसऱया षटकात जॉनी बेअरस्टॉ (7) व त्याच्या जागेवर आलेला रिली रोसॉ (0) यांच्या यष्टय़ा उद्ध्वस्त करून चेन्नईला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंग (30) व शशांक सिंग (27) यांनी तिसऱया विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करीत पंजाबला 2 बाद 9 अशा संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला. मिचेल सँटनरने शशांकला सिमरजीत सिंगकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर पुढच्याच षटकात रवींद्र जाडेजाने प्रभसिमरनला बाद करून पंजाबची 9 षटकांत 4 बाद 68 अशी दुर्दशा केली. या धक्यातून पंजाबला पुन्हा सावरता आले नाही. कर्णधार सॅम करण (7), जितेश शर्मा (0) व अशुतोष शर्मा (3) ही मधली फळी अपयशी ठरल्याने येथेच पंजाबचा पराभव अधोरेखीत झाला. त्यानंतर हरप्रीत बार (नाबाद 17), हर्षल पटेल (12), राहुल चहर (16) व पॅगिसो रबाडा (नाबाद 11) या तळाच्या फलंदाजांनी दिलेली लढत टी-20 क्रिकेटला साजेशी नसल्याने पंजाबचा पराभव झाला. चेन्नईकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले. तुषार देशपांडे व समरजित सिंग यांना 2-2 विकेट मिळाले, तर मिचेल सँटनर व शार्दुल ठाकूर यांनीही 1-1 गडी बाद केला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 9 बाद 167 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी करीत संकटमोचकाची भूमिका बजावली. त्याने 26 चेंडूंत 3 चौकारांसह 2 षटकार ठोकले. त्याआधी, कर्णधार ऋतुराज गायकवाड (32) व डॅर्ली मिचेल (30) हे धावांची तिशी गाठणारे फलंदाज ठरले. सलामीवीर अजिंक्य रहाणे (9), शिवम दुबे (0), मोईन अली (17) ही मधली फळी अपयशी ठरल्याने चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. मिचेल सँटनर (11) व शार्दुल ठाकूर (17) या तळाच्या फलंदाजांनीही जाडेजाला काही वेळ साथ दिल्याने चेन्नईला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. पंजाबकडून राहुल चहर व हर्षल पटेल यांनी 3-3 फलंदाज बाद केले. अर्शदीप सिंगला 2, तर सॅम करणला एक विकेट टिपता आला.

फलंदाज तिशीच्या पुढे जाऊ शकला नाही. सॉल्ट आणि रघुवंशीने प्रत्येकी 32 धावा केल्या.