भूसंपादन घोटाळ्यातील पैसा मिंधेंकडे कसा पोहचतो, पुराव्यासह सिद्ध करणार; संजय राऊत यांचा मोठा दावा

भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले 800 कोटींचे गैरव्यवहार नाशिकमधील आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींची खैरात केली. हे पैसे बिल्डरांच्या माधअयमातून कोणाकडे गेले, याबाबत आपण माहिती काढली आहे. त्याबाबत आपण रीतसर तक्रार करणार असल्याचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठी माणसासाठी बुळचट फडणवीसांची शिवसेना काय करत आहे, असा सवालही केला.

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना सर्व महापालिका क्षेत्रात असे घोटाळे झाले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात येत असलेला पैसा कोणाच्या माध्यमातून येत आहे, त्याचा खुलासा आपण करत आहोत. नाशिकमध्ये भूसंपदानाच्या नावाखाली 800 कोटी गैरमार्गाने जमा केले. जनतेचा, करदात्यांचा पैसा मर्जीतल्या बिल्डरांना सरकारी तिजोरीतून 800 कोटी देण्यात आले. हा पैसा मनी लॉडरिंगद्वारे फडणवीस शिवसेना गटाकडे कसा पोहचत आहे, हे दोन दिवसात आपण पुराव्यासह जाहीर करणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

याआधीचे सरकार असताना नगरविकासमंत्री तेच होते आणि आताही तेच आहेत. शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित असलेला 17 ते 18 बिल्डर आहेत. त्या बिल्डरांना फायदा मिळावा, यासाठीच भूसंपादनाचा रेटा लावला. राज्यात शेतकरी संकटात असताना त्यांना मदत मिळाली नाही. मात्र, बिल्डरांना पैसा मिळाला. हे बिल्डर मिंधे आणि फडणवीस गटाचे खास हस्तक आहेत. समृद्धी महामार्ग आणि एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या बाबतही हेच होत आहे. सध्या आपण नाशिक महापालिकेतील भूसंपादनाचे प्रकरण उघड करत आहोत. राज्यात अशा प्रकारची लूट सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबईत एका गुजराती कंपनीने मराठी माणसांनी अर्ज करू नये, असे म्हटले होते. महाराष्ट्रात मराठी माणसांनी नोकरीसाठी अर्ज करून नये, असे एका कंपनी म्हणत असताना स्वतःला खरी शिवसेना म्हणवणाऱ्यांनी याविरोधात काय केले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन झाली होती. अशावेळी सरकार आणि स्वतःला खरी शिवसेना म्हणवणारे मिंधे गट काय करत होते. त्यांच्यात हिंमत असेल तर याविरोधात आवाज द्यावा, अन्यथा आम्ही भूमिका घेण्यासाठी समर्थ आहोत. घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुसंख्या असलेल्या सोसायटीत मराठी असल्याने शिवसैनिकांना रोखण्यात आले. महाराष्ट्रात अशा घटना घडत असताना फडणवीसांची शिवसेना बुळचट सेना झाली आहे. ती गांडूची सेना आहे. मराठी माणसांचा अपमान होत असताना ते काय करत आहेत. हा मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणासाविरोधातील या षडयंत्राविरोधात आम्ही लढणार आहे. बुळचट, गांडू फडणवीसांची शिवसेना काय करणार, हा आमचा प्रश्न आहे.

हेमंत करकरे हे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. त्या हल्लावेळी करकरे यांच्यासह, कामटे, साळसकर हे शहीद झाले. हेमंत करकरे यांच्याबाबत संशय निर्माण करत आहेत. करकरे आणि राष्ट्रीय संघाचे काही संघर्ष होते. त्यामुळे असा मुद्दा उपस्थित होत आहे. विजय वडेट्टीवार यांनी विधान केले, असे सांगण्यात येते. मात्र, हू किल करकरे या पुस्तकात याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे पुस्तकाचे लेखक एस.एन. मुश्रीफ यांना सवाल करायला हवा. साध्वी प्रज्ञासिंह,कर्नल पुरोहित, स्वामी दयानंद यांना करकरे यांनी अटक केली होती. ते सर्व संघाच्याजवळचे होते. त्यामुळे अशी थेअरी मांडण्यात येते. मात्र, त्यावर आपला विश्वास नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. हेमंत करकरे हे देशासाठी शहीद झाले आहेत. असे आपले मत आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने भाजपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाडजपकडून होत आहे. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांनी आमचे आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार का फोडले, ते त्यावर का बोलत नाही. त्यांनी स्वतः शेण खाल्ले आहे आणि ते दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेत आहेत. स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्यावर आरोप करायचे, हे भाजप आणि फडणवीस यांचे धोरण आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.