प्ले ऑफसाठी जर-तरच्या स्वप्नांना वेग

मुंबईपाठोपाठ बंगळुरू, गुजरात आणि पंजाबचे प्ले ऑफमध्ये पोहोचणे आता कठीण झाले आहे. पण आता या संघाचे चाहते जर असे झाले तर आपला संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल आणि तसं घडलं तर हा संघ आयपीएलमधून बाद होईल, अशी समीकरणे रंगवू लागली आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्ले ऑफच्या स्वप्नांना पंख लागलेली पाहायला मिळतील, इतके मात्र निश्चित आहे.

खरं सांगायचे तर मुंबईनंतर सात सामने पराभूत झालेले तिन्ही संघाच्या प्ले ऑफच्या आशा मावळल्या आहेत. या संघांना फक्त चमत्कारच वाचवू शकतो. तो चमत्कार म्हणजे यापुढील सर्व सामने राजस्थानने जिंकायला हवेत. त्याचबरोबर कोलकाता, चेन्नई, लखनऊ आणि हैदराबादने आपले उरलेले चारही सामने हरायला हवेत. त्याचबरोबर बंगळुरू, गुजरात आणि पंजाब पुढील तिन्ही सामने जिंकले तरच ते प्ले ऑफचे स्वप्न पाहू शकतात. पण इतके जर तर जुळून येणे अशक्य आहे. बंगळुरू असो किंवा पंजाब हे पुढील आपले तिन्ही सामने भले जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील, पण चेन्नई, लखनऊ, हैदराबाद आणि कोलकाता हे चारही संघ आपले सर्व सामने कसे हरतील. हे कदापि शक्य नाही. कारण हे चार संघ एकमेकांविरुद्धही एकेक सामना खेळणार आहेत आणि त्यापैकी कुणीही जिंकला तरी त्यांच्या गुणांचा आकडा नक्कीच 16 वर पोहोचणार आहे. चमत्काराबद्दल बोलायचे झाल्यास पराभवाची साडेसाती घेऊन खेळणारा किमान एकच संघ विजयाची हॅटट्रिक मारू शकतो. त्यामुळे बंगळुरू, गुजरात आणि पंजाबला चमत्कारही वाचवू शकत नाही, हेच सत्य आहे.

प्ले ऑफचे सहा दावेदार

मुंबई आयपीएलमधून बाद झाला आहे आणि बंगळुरू, गुजरात आणि पंजाब हे तिन्ही संघ हे कोमात आहेत. त्यामुळे अव्वल असलेल्या सहापैकीच चार संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. सध्या या सहाही संघांची गुणसंख्या 16 होऊ शकते. त्यामुळे कुणालाही प्ले ऑफचा टिळा लागू शकलेला नाही. मात्र कोलकाता, राजस्थान हे संघ जवळजवळ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. त्याचबरोबर चेन्नई, लखनऊ, हैदराबाद आणि दिल्ली या चारही संघांना प्ले ऑफची समान संधी आहे. पण या चार संघांपैकी नेमका कोणता संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवेल, हे सांगणे कठीण आहे. आणि जर-तरचे चमत्कारिक समीकरण जुळले तर बंगळुरू, पंजाब आणि गुजरातपैकी एखादा संघ प्ले ऑफचे स्वप्न साकार करू शकतो.