ब्राझील बुडाले; 60 लोकांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असून पूर आणि भूस्खलनामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील रिओ गांद्रे डो सुल या राज्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले तर हजारो लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. दरम्यान, पुरामुळे 57 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता झाले आहेत, तर 74 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसाचा तब्बल 281 नगरपालिकांना फटका बसला असून बचाव पथके बचाव कार्य करत आहेत. 67 हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलेल्या भागात सरकारने नैसर्गिक आपत्तीची स्थिती घोषित केली असून साडेचार हजाराहून अधिक लोक तात्पुरत्या निवाऱयांमध्ये आश्रयाला थांबले आहेत.

पाळीव प्राण्यांचाही शोध सुरू

स्छोटय़ा इमारती पूर्णपणे बुडाल्याचे चित्र आहे. बचाव पथके नागरिकांसोबत पाळीव प्राण्यांनाही शोधून वाचवत आहेत. शनिवारी सकाळी सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या पावसामुळे गुआइबा सरोवरातील पाण्याची पातळी पाच मीटरने वाढली. त्यामुळे राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रे पाण्याखाली गेल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

 

नदीचा बंधारा फुटला, घरे बुडाली, वाहने वाहून गेली

रिओ गांद्रे डो सुल राज्यात पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढल्याने नदीचा बंधारा फुटल्याची माहिती आहे. पोर्टो अलेग्रा या शहराची एकूण लोकसंख्या 1.4 दशलक्ष असून या शहराला पुराचा मोठा फटका बसला. शहरातून वाहणारी गुआइबा नदीची पूररेषा 5.04 मीटर किंवा 16.5 फूट इतकी उंच आहे. ही पातळी 4.76 मीटरच्या धोक्याच्या पातळीहून अधिक आहे. 1941 ला या राज्याला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आज येथे पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मोठय़ा संख्येने घरे पाण्याखाली गेली असून असंख्य वाहने वाहून गेली. रस्ते वाहून गेले, जिकडे तिकडे विध्वंस झाल्याचे दिसत आहे.