कोलकाता नंबर वन

7 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी करणाऱया सुनील नारायणच्या 39 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर कोलकात्याने 6 बाद 235 धावांचा डोंगर उभारला आणि लखनऊचा संघ आपल्याच घरच्या मैदानावर कोलकात्याच्या माऱयापुढे 137 धावांतच डोंगराच्या ढिगार्याखाली गाडला गेला. कोलकात्याने 98 धावांच्या मोठय़ा विजयासह 16 गुणांनिशी राजस्थानचे गेल्या महिनाभरापासून अव्वल स्थान हिसकावून घेतले. या विजयामुळे कोलकाता आणि राजस्थानचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता या संघाचा पुढचा विजय त्यांचे प्ले ऑफचे स्थान पक्के करील.

कोलकात्याच्या 236 धावांच्या आव्हानासमोर लखनऊ अक्षरशा कोलमडला. सलामीला आलेल्या के. एल. राहुल आणि अर्शिन कुलकर्णीला पुन्हा एकदा अपयश झेलावे लागले. तो 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल (25) आणि मार्कस स्टॉयनिसने (36) दुसऱया विकेटसाठी 50 धावांची भागी रचली खरी, पण त्या भागीला धारच नव्हती. ही जोडी फुटल्यानंतर लखनऊला पाहुण्यांचीच विकेटनवाजी करावी लागली.हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी तीन विकेट उडवत लखनऊचा धावांचा बाजार 137 धावांवरच उधळून लावला. त्याआधी फिल सॉल्ट आणि नारायणने 4.2 षटकांत 61 धावांची घणाघाती सलामी दिली. मग अंगक्रिश रघुवंशीबरोबर 79 धावांची भागी रचली. नारायण बाद झाल्यानंतरही सर्व फलंदाजांनी आपल्या बॅटीतून दोन अंकी धावांचे योगदान देत कोलकात्याला 235 पर्यंत नेले. कोलकात्याने इतकी मोठी मजल मारली असली तरी त्यांच्या या डावात नारायणवगळता एकही फलंदाज तिशीच्या पुढे जाऊ शकला नाही. सॉल्ट आणि रघुवंशीने प्रत्येकी 32 धावा केल्या.