माझा बाप बिल्डर असता तर? युवक काँग्रेसकडून आज निबंध स्पर्धेचे आयोजन

कल्याणीनगरमध्ये बिल्डरपुत्राच्या कारने दिलेल्या धडकेत दोघांचा चिरडून मृत्यू झाला. या संतापजनक घटनेवरून पुण्यातले वातावरण तापले असतानाच आता घटना घडली त्या ठिकाणी पुणे युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषयही लक्षवेधी ठेवले असून प्रथम येणाऱ्यास 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिकदेखील देण्यात येणार आहे.

पुण्यात कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर ही निबंध स्पर्धा रविवार, 26 मे रोजी सकाळी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. निबंध लेखनासाठी ‘माझी आवडती कार (पॉर्शे, फेरारी)’, ‘दारूचे दुष्परिणाम’, ‘माझा बाप बिल्डर असता तर…’, ‘मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर…’, ‘अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?’ हे विषय देण्यात आले आहेत. या विषयांमुळे ही स्पर्धा चर्चेत आहे. या स्पर्धेसाठी वयोगटही मर्मावर बोट ठेवणारा आहे. 17 वर्षे 8 महिने ते 58 वर्षांपर्यंतचे नागरिक या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरद्वारे दिली.