बूथनिहाय आकडेवारी देण्यास टाळाटाळ, निवडणूक आयोगाने पुन्हा जुनीच टक्केवारी जाहीर केली

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अवघा एक टप्पा राहिला असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने बुथनिहाय आकडेवारी देण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली आहे. आज आयोगाने पाच टप्प्यांतील मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे.

मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास निवडणूक आयोगाकडून विलंब केला जात आहे. मतदान झाल्यानंतर अनेक दिवसांनी मतदानात पाच ते सात टक्क्यांनी वाढ झाल्याचे जाहीर केले जाते असा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली.

मतदानाची बूथनिहाय आकडेवारी आणि ‘फॉर्म 17-सी’ डेटा मतदानानंतर 48 तासांत निवडणूक आयोगाने वेबसाइटवर अपलोड करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बूथनिहाय आकडेवारी मिळणार नाही असे सांगताना आयोगाला तातडीने निर्देश देण्यास नकार दिला होता.

आज जाहीर केलेली आकडेवारी

टप्पा एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी
पहिला टप्पा 16.63 कोटी 11 कोटी 66.14 टक्के
दुसरा टप्पा 15.86 कोटी 10.58 कोटी 66.71 टक्के
तिसरा टप्पा 17.24 कोटी 11.32 कोटी 65.68 टक्के
चौथा टप्पा 17.70 कोटी 12.24 कोटी 69.16 टक्के
पाचवा टप्पा 8.95 कोटी 5.57 कोटी 62.20 टक्के

आज निवडणूक आयोगाने पाच टप्प्यांत ज्या मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे त्याची टक्केवारी पुन्हा जाहीर केली. त्यात फक्त मतदारसंख्या जोडली गेली आहे. वास्तविक मतदानानंतर आयोगाने ही टक्केवारी जारी केली होती तीच पुन्हा दिली. दरम्यान, विरोधी पक्षांनी केलेले आरोप आयोगाने फेटाळले असून निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.