राहुरी तालुक्यात बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; पती-पत्नीसह दोन मुले जखमी

राहुरी तालुक्यात वरवंडी भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याने एका चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच याच गावात आणखी एक घटना घडली आहे. गावातील नवनाथ सकाहरी ढगे मोटारसायकलने पत्नी व दोन मुलासह रविवारी रात्री 10.30 वाजता घरी जात परतत होते. त्यावेळी वरवंडी भागात अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घालत हल्ला केला. या हल्ल्याने दुचाकी उलटल्याने दुचाकीवरील पतीसह दोन मुले किरकोळ तर महिला गंभीर जखमी झाली आहे.

वरवंडी (ता.राहुरी) येथील नवनाथ सकाहरी ढगे हे रविवारी रात्री 10.30वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने पत्नी आणि दोन मुलांसह घरी परतत होते. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. दुचाकी पडल्यानंतर बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. बिबट्याच्या या हल्ल्यात नवनाथ ढगे यांच्यासह दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले होत आहेत. वनविभागाकडून अनेकदा पिंजरे लावण्यात येतात. मात्र, गावकरी या भागात पिंजरे लावण्यासाठी योग्य ते सहकार्य करीत नसल्याचे वनविभाचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. योग्य ठिकाणी पिंजरे लावता येत नसल्याने बिबट्यांना जेरबंद करता येत नाही, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.