शासकीय अधिकाऱ्यांना ‘फोर बीएचके’चे फ्लॅट मिळणार; एमएमआर क्षेत्रात 200 चौरस मीटरपर्यंत निवासस्थान, बड्या अधिकाऱ्यांना दोन हजार स्क्वेअर फुटांची घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या जीवनशैलीच्या गरजा, वाढते शहरीकरण, जमिनीची उपलब्धता आणि बहुमजली इमारतींचे निकष लक्षात घेऊन राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या सरकारी निवासस्थानांचे चटई क्षेत्रफळ (एफएसआय) वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी चार बेडरूम, घरातील नोकरांसाठी स्वतंत्र खोली आणि कार्यालयासह 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचे निवासस्थान प्रस्तावित आहे. म्हणजे या अधिकाऱ्यांना सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटांचे घर मिळेल असा प्राथमिक अंदाज आहे

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांसाठी चटई क्षेत्रफळ वाढवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. मुंबई, ठाणे नवी मुंबई या भागातील जमिनीची उपलब्धता, वाढती लोकसंख्या व बहुमजली इमारतीचे निकष विचारात घेता या भागासाठी चटई क्षेत्रफळाची स्वतंत्र मानके असणे आवश्यक असल्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

नवीन बांधकामांनाच निकष लागू

सुधारित क्षेत्रफळाचे निकष केवळ नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या बांधकामांसाठी लागू राहतील. यापूर्वी पूर्ण झालेल्या किंवा सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना हे निकष लागू होणार नाहीत. बांधकामाधीन निवासस्थानांच्या वाटपामध्ये कर्मचाऱ्यांना श्रेणीवाढ लागू होणार नाही.

सातव्या वेतन आयोगानुसार निर्णय

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या सरकारी निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुधारणा केली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर विचारात घेऊन नव्या निवासस्थानांचे क्षेत्रफळ निश्चित केले आहे. बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांसाठी स्वतंत्र निकष लागू केले असून, उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळी क्षेत्रफळ मर्यादा आहे. यापूर्वी निश्चित केलेले निकष या शासन निर्णयाद्वारे रद्द केले आहेत.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना 484 चौ. फुटांचे घर

कनिष्ठ वेतनस्तरातील कर्मचाऱ्यांना 484  स्क्वेअर फुटांचे घर मिळेल. मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील महाराष्ट्रासाठी काही श्रेणींमध्ये अधिक क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठ वेतनस्तरातील अधिकाऱ्यांसाठी चार बेडरूम, सेवक कक्ष आणि कार्यालयासह 240 चौरस मीटरचे निवासस्थान प्रस्तावित आहे. तीन बेडरूम, सेवक कक्ष आणि कार्यालयासाठी 200 चौरस मीटर, तर तीन बेडरूम, सेवक कक्ष आणि अभ्यासिकेसह 160 चौरस मीटर क्षेत्रफळ निश्चित केले आहे.