सिनेमा – भीतीचे गारूड शैतान

>> प्रा. अनिल कवठेकर

वशीकरण या जुन्या संकल्पनेवर आधारित ‘शैतान’ हा चित्रपट आहे. 2023 मध्ये ‘वश’ नावाचा गुजराती भाषेत चित्रपट आला होता. त्याचा हा रिमेक आहे. हल्लीच्या काळात काही चित्रपट आपल्या देशातील अंधश्रद्धा दूर करायला मदत करत असताना ‘शैतान’ नावाचा चित्रपट पुन्हा एकदा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा आहे. पण शेवटी जर मनोरंजन म्हणून आपण या चित्रपटाकडे पाहिलं तर हा चित्रपट नक्कीच तुम्हाला घाबरवण्यात मदत करतो. 

एक सुखी कुटुंब. कबीर त्याचा नऊ वर्षांचा मुलगा ध्रुव, 18 वर्षांची मुलगी जान्हवी आणि त्याची बायको लॉंग ड्राइव्हवर जातात. मुलाला बाथरूमला जायचं म्हणून एका ढाब्यावर ते थांबतात. तिथे चहा घेताना कबीरकडे सुट्टे पैसे नसतात म्हणून एक माणूस सुट्टे पैसे देऊन त्यांना चहा पाजतो आणि कधीतरी माझा चहा मला परत करा असंही सांगतो. त्याचं नाव वनराज असतं. चांगुलपणातून कबीर त्याला आपल्या टेबलावर जेवायला आमंत्रित करतो. त्यावेळी कबीरला एक फोन येतो. तेवढय़ा कालावधीत वनराज एक लाडू जान्हवीला खायला देतो आणि जान्हवीला त्याच्या नियंत्रणात करतो. आता  जान्हवीला तो जे सांगेल ते ती ऐकते. जान्हवीला खूप बटर लावलेला पराठा आवडत नाही. पण वनराजने सांगितल्यावर ती तो खाते. आईवडिलांच्या नकळत वनराज तिला एक बिस्कीटचा पुडा देऊन फार्म हाऊसवर पोहोचल्यावर खा असे सांगतो. ती अगदी तसंच करते. थोडय़ा वेळानंतर कबीरची पामिली घरी पोहोचल्यावर  स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत असताना वनराज तिथे येतो. माझा मोबाइल चार्ज करण्यासाठी आल्याचं तो सांगतो आणि त्याच्या खेळाला सुरुवात होते. तो जान्हवीला वारंवार हिप्नोटाइज करतो. ध्रुव व्यत्यय आणतो म्हणून तो तिला त्याच्याबरोबर असं खेळ की, तो परत तुझं नाव घेणार नाही. ती त्याला झोक्यावर बसवून प्रचंड उंच झोके घेते. इथे

कॅमेराचा अँगल असा लावलाय की त्या झोक्याची भीती वाटावी. खेळणाऱ्याला आणि पाहणाऱ्यालाही. पार्श्वसंगीत मनाचा ताण वाढवतं. ध्रुवला समजत नाही. आपली बहीण असं का करतेय? तो तिला थांबण्याची विनंती करतो. पण ती थांबत नाही. आई सांगते… बाबा सांगतात… ती थांबत नाही. जेव्हा वनराज सांगतो तेव्हा ती थांबते.

जान्हवी त्याला सांगते की, तिला काय झालंय ते कळत नाही. तेव्हा तो सांगतो, तुझ्या मित्राला फोन करून तू लडाखला येणार नसल्याचं सांग आणि त्याच्याबरोबर ब्रेकअप कर. ती लगेच त्याला फोन करून तसं सांगते. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. ती पूर्णपणे एका अनोळखी व्यक्तीच्या नियंत्रणात गेली आहे. तो जे सांगेल तेच ती बोलते. तेच ती करते. कबीर वनराजच्या हाताला धरून त्याला बाहेर जायला सांगतो. तेव्हा तो म्हणतो की, काम झाल्याशिवाय मी जाणार नाही आणि जान्हवी म्हणते की, अंकल आता जाणार नाहीत.

आपली मुलगी असं का बोलते? हा एक मोठा प्रश्न आईवडिलांना पडला आहे. दोघांच्या हाणामारीत वनराज तिला आपल्या बापावर हमला करायला सांगतो. जान्हवी वडिलांवर हमला करते. वनराज शांतपणे सोफ्यावर बसलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर काळ्या जादूच्या ताकदीचा भाव दिसत आहे. हे  सुखी कुटुंब काही क्षणांपूर्वी जे आनंदाचे क्षण जगत होतं ते आता एका भयाण अमानवी, अविश्वसनीय, अनाकलनीय, पाशवी असं त्यांच्या मुलीसोबत घडताना अनुभवत आहे. अशावेळी नेमकं काय करावं हे कबीर व त्याच्या बायकोला सुचत नाही. वनराज इंटरनेट कनेक्शन कापायला सांगतो. घरातील सगळे मोबाइल फोडायला लावतो. बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून टाकतो. त्याचं हत्यार वशीकरण आहे. त्याच्या आदेशावर कोणाचाही खून करायला तयार असणारी जान्हवी, हे त्याचं हत्यार आहे. त्याला ती दान म्हणून हवी आहे.

ग्रहण सुटण्याच्या काळात काही भिकारी ‘दे दान सुटे गिरान’ असं म्हणत येतात. वनराजच्या माध्यमातून जान्हवी नावाचं ग्रहण कबीरच्या कुटुंबाला लागलेलं आहे. जान्हवी आईवडिलांचा जीव की प्राण आहे. पण त्यांना हवी असलेली जान्हवी ती ही नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. सगळ्यांचे मोबाइल फोडलेत, इंटरनेट कनेक्शन नाही तरीसुद्धा न बोलावताना पोलीस तिथे येतात. जे अनेक वेळा अनेक सिनेमांमध्ये आलेले आहेत. ज्या वेळी पोलीस येतात त्यावेळी वनराजने जान्हवीला गॅस सिलेंडरवर बसवलेलं आहे. गॅस सिलेंडरमधून गॅस बाहेर येतोय. हातामध्ये ती माचिसची काडी घेऊन बसलेली आणि ती कोणत्याही क्षणी गॅस पेटवण्याच्या पावित्र्यात बसलेली आहे.  त्यामुळे कबीरला पोलिसांना काहीच सांगता येत नाही. अशी नियंत्रित स्थिती वनराजने करून ठेवलेली आहे. बऱ्याचदा जान्हवीच्या डोळ्यात तिची अगतिकता दिसते, पण ती स्वतला थांबवू शकत नाही. जान्हवीची भूमिका करणाऱ्या जानकी बोडीवाला हे दाखवण्यात यशस्वी झालेली आहे.

कबीर सगळे पैसे, दागिने देऊन वनराज घराबाहेर जायला सांगतो. पण वनराज ते सगळे पैसे पेटवून देतो आणि म्हणतो की माणूस पैशाच्या मागे लागल्यावर आणि पैसा कमावल्यावर त्याला असं वाटतं की, तो पैशाने सगळं काही विकत घेऊ शकतो. वनराज हा शैतान आहे. शैतानाच्या तोंडी अशी फिलॉसॉफी मांडण्याचा जो प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे तो मनाला पटत नाही.

जान्हवी आपल्या भावाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देते. तरीही भाऊ सांगतो की, जान्हवीला परत आणा आणि इथून चित्रपटाचा उत्तरार्ध सुरू होतो. ‘शैतान’मध्ये अनेक तांत्रिक चुका आहेत. जान्हवीच्या आईची भूमिका ज्योतिकाने छान प्रकारे केली आहे. अजय देवगनच्या वाटय़ाला जी भूमिका आली आहे ती त्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेने अत्यंत वेगळी असल्यामुळे त्याला ते सगळे भाव इतक्या प्रभावीपणे दाखवता आलेले नाहीत. कारण अजय देवगन म्हटल्यानंतर ‘सिंघम’ डोळ्यासमोर उभा राहतो. इथे त्याला फक्त संवादातून नाही तर चेहऱ्याने, डोळ्याने बोलायचं असल्याने अजय फार प्रभाव टाकू शकलेला नाही. व्हिलन इंग्रजीत बोलतो, पण तो जेव्हा तांत्रिक होतो तेव्हा मात्र तो काळे कपडे घालून चेहऱ्यावर रंगरंगोटी करतो. म्हणजे आधीचा इंग्रजी बोलणारा वनराज हा जितका प्रभावी वाटतो. तितका अघोरी झालेला वनराज प्रभावी वाटत नाही. वनराजची भूमिका आर. माधवन उत्तमरित्या निभावली आहे. पण तो वारंवार जान्हवीला ज्या शिक्षा करतो त्या थोडय़ा अति वाटतात. कारण एकदा प्रेक्षकांना समजलं की, ती त्याच्या ताब्यात आलेली आहे तेव्हा हे पुन्हा पुन्हा दाखवण्यात काही अर्थ नव्हता.

चित्रपटाची लांबी अर्धा तास जर कमी केली असती तर हा चित्रपट अधिक वेगवान होऊन मनाची पकड घेऊ शकला असता. कारण शेवटचा अर्धा तास खूपच जास्त ताणल्यासारखा वाटतो.

 एवढं मात्र नक्की की, पहिल्या पाच मिनिटांतच चित्रपट मनाची पकड घेतो. आर. माधवनचा शैतान आपल्या मनावर भीतीचे गारुड करतो. आपल्याला त्या कथेत गुंगवून ठेवतो आणि आपण त्यात आपसूक गुंडाळले जातो. पुढे काय पुढे काय हे सारखं वाटत राहतं आणि तसंच काहीतरी घडत राहतं. सिनेमाचं संगीत मनाची चांगलीच पकड घेणारं आहे त्यामुळे सिनेमा संपल्यावरही ते मनात गुंजत राहतं.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)