दिल्लीत अग्नितांडव! बेबी केअर सेंटरला भीषण आग; 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील विवेक विहारमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका बाल संगोपन केंद्राला (बेबी केअर सेंटर) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून 12 जणांना वाचवण्यात यश आले आहेत. यापैकी 5 बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त दिले आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी विवेक विहारमधील बाल संगोपन केंद्राला (बेबी केअर सेंटर) आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत बाल संगोपण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 12 नवजात बालकांना सुखरूप बाहेर काढले. मात्र 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला.

विवेक विहार भागातील ब्लॉक बी आयटीआयजवळ 120 यार्डच्या इमारतीमध्ये हे बाल संगोपण केंद्र उभारण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच प्रचंड गोंधळ उडाला आणि कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. आजूबाजूच्या लोकांनीही घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर वेगवेगळ्या फायर स्टेशनमधून अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. वेळ न दवडता जवानांनी स्थानिक लोकं आणि बाल संगोपण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले अशी माहिती फायर डायरेक्टर अतुल गर्ग यांनी दिली.

एक-एक करून इमारतीतून नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. जवळपास एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग विझवल्यानंतर कुलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून बाल संगोपन केंद्रातील ऑक्सिजन सिलिंडरचा यात स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

गुजरातमध्ये गेम झोनला भीषण आग; 12 मुलांसह 26 जणांचा होरपळून मृत्यू