गुजरातमध्ये गेम झोनला भीषण आग; 12 मुलांसह 26 जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागली. अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या भयंकर आगीत 12 लहान मुलांसह 26 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेह इतक्या गंभीररीत्या जळाले आहेत की ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

राजकोट शहरातील कावद रोडवर टीआरपी मॉलमधील हे गेम झोन आहे. आगीने गेम झोन अक्षरशः गिळून टाकले. आगीचे लोट आकाशात सर्वदूर पसरले होते. तेथे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अग्निशमन दल व बचाव पथकाने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले. बचावकार्य वेगाने सुरू होते. गेम झोनमध्ये किती जण होते याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. 25 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

गुन्हा नोंदवणार

युवराज सिंग सोलंकी यांच्या मालकीचे हे गेम झोन आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास सुरू होईल. मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. निष्काळजीपणा व मृत्युप्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार आहे, अशी माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिली.

ढाचा कोसळला

गेम झोनचा तात्पुरता ढाचा आगीमुळे कोसळला आहे. याने बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या. आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही, असे अग्निशमन अधिकारी आय. व्ही. खैर यांनी सांगितले.

एसआयटी तपास करणार

मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी आगीची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येईल असे सांगितले. राज्य सरकारच्या वतीने मृतांना प्रत्येकी चार लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली.

गेम झोनची राखरांगोळी

गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. तेथे लाकडाचे सामान अधिक होते. त्यामुळेच आग वेगाने पसरली. आगीने गेम झोनची राखरांगोळी केली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

– आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. तिथे आग लागली. दहा सेकंदात आग सर्वत्र पसरली. कर्मचाऱयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे लोट बघून लोक सैरावैरा पळू लागले. पुढच्या तीस सेकंदांत आगीने गेम झोनमध्ये तांडव सुरू केले. पेट्रोल, डिझेलचे डबे तेथे होते. त्याने आग अधिकच भडकली, असे प्रत्यक्षदर्शी यश पटोलिया यांनी सांगितले.