अकोला, जळगावमध्ये उष्णतेमुळे जमावबंदी

सूर्य अक्षरशः आग ओकत असताना जळगावमध्ये पाऱयाने थेट 47 अंशांवर, तर अकोल्यात 45.06 अंशांवर झेप घेतल्याने उकाडा प्रचंड वाढल्याने 3 जूनपर्यंत दिवसा ‘जमावबंदी’ लागू करण्यात आली आहे. उष्णतेची लाट असल्याने नागरिकांच्या प्रकृतीला धोका असल्यामुळे ही जमावबंदी जाहीर करण्यात आली असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित पुंभार यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

राज्याच्या अनेक भागांत पाऱयाने चाळिशी पार केल्याने सकाळी 10 वाजल्यापासूनच घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी उकाडय़ापासून बचाव करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे रोजगार हमीसह वेगवेगळय़ा प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळय़ा शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जळगाव जिल्हा आरोग्य विभागानेही याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

असे आहेत आदेश

– खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. पर्यायी व्यवस्था करावी.
– कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेशी शेड तयार करणे, कुलर पिंवा इतर साधने पंपन्यांनी पुरवावी.
– दहा वर्षांखालील बालकांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर खेळू नये पालकांनी काळजी घ्यावी.
– दैनंदिन काम असल्यास रुमाल, टोपी अशी आवश्यक खबरदारी घेऊन बाहेर पडावे. मुबलक पाणी प्यावे.
z उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून उपचार करून घ्यावे.

आठवडी बाजार पडले ओस

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागल्याने आठवडे बाजारावरदेखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून आला. मुख्य रस्त्यांवर उन्हामुळे वर्दळ कमी होती. आठवडी बाजारात दुपारी चारपर्यंत बाजारात शुकशुकाट होता. जनावरांच्या बाजारातही उन्हामुळे आवक मंदावली.

उष्माघातामुळे 100 मेंढय़ांचा मृत्यू

जळगावमध्ये उष्णतेचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. जळगाव जिह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱहा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 मेंढय़ांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.