पाऊलखुणा – ललितांकुर लेणी तिरुचिरापल्ली

>> आशुतोष बापट

लयन स्थापत्य म्हणजेच लेणी ही पल्लवांची एक खास स्थापत्य शैली होती. मंडगपट्टू इथून सुरू झालेला हा खोदीव स्थापत्याचा प्रवास आपल्याला पल्लवांच्या राज्यात विविध ठिकाणी दिसून येतो. सित्तनवासल जैन लेणी असो किंवा महाबलीपुरम इथली अतिशय सुबक कृष्ण मंडप, वराह मंडप, महिषासुरमर्दिनी लेणी असो, पल्लवांचे लयनस्थापत्य या प्रदेशी चांगलेच विकसित झालेले दिसते. या लेण्यांमध्ये अजून एक सुंदर लेणी आहे ती तिरुचिरापल्ली अर्थात त्रिची इथली लेणी. त्रिची हे गाव तंजाऊरच्या पश्चिमेला 60 किलोमीटर अंतरावर आहे. जगप्रसिद्ध श्रीरंगम मंदिर याच त्रिची इथे आहे.

त्रिची गावात एक भलामोठा प्राचीन खडक आहे. त्या खडकाला रॉक फोर्ट असं म्हणतात. या खडकावर ‘उच्चिपिलय्यार मंदिर’ हे गणपतीचे मंदिर आहे. याच खडकात इ.स.च्या सातव्या शतकात पल्लव राजा महेंद्रवर्मन याने लेणी खोदली आहेत. इथे दोन लेणी आहेत. एक वरच्या बाजूला, तर दुसरी खालच्या बाजूला उजव्या कडेला आहे. यातल्या महेंद्रवर्मन या पल्लव राजाने खोदलेल्या वरच्या लेणीला ‘ललितांकुर लेणी’ असे सुंदर नाव आहे. पायथ्यापासून अंदाजे 200 मीटर उंचीवर हे लेणे खोदलेले आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱया केलेल्या आहेत.

ललितांकुर लेणी ही अगदी खास पल्लव लेणी आहेत. समोरच्या बाजूला पल्लव शैलीतले चार खांब दिसतात. हे खांब खालच्या आणि वरच्या बाजूला चौकोनी आणि मधल्या भागात अष्टकोनी आकार असलेले आहेत. या लेणीत असलेल्या शिलालेखात असे नमूद केलेले आहे की, हे लेणे महेंद्रवर्मन राजाने खोदले. या लेणीत पूर्वाभिमुख एक गाभारा असून त्याच्या बाहेरच्या बाजूला दोन बलदंड द्वारपाल दिसतात. गाभारा आता रिकामा असून त्यात पूर्वी शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती होती. या लेणीचे सौंदर्य अजून उठून दिसते ते इथल्या पश्चिम भिंतीवर कोरलेल्या शिल्पामुळे. हे देखणं शिल्प गंगाधर शिवाचे आहे. इथे शिवाने आपल्या जटेत गंगा धारण केली आहे आणि ती जटा मोकळी करून तो आता ती गंगा पृथ्वीवर प्रवाहित करण्याच्या बेतात असल्याचे शिल्पांकित केलेले आहे. शिव त्रिभंग अवस्थेत असून त्याने आपला एक पाय जमिनीवर, तर दुसरा पाय गणाच्या डोक्यावर ठेवलेला आहे. चतुर्भुज शिवाच्या खालच्या उजव्या हातात सर्प असून डावा हात देवाने आपल्या कमरेवर ठेवलेला दिसतो. उजव्या वरच्या हाताने शिवाने आपली एक जटा धरलेली दिसते. गंगा नदी या जटेतून बाहेर येताना दाखवली आहे. गंगा नदी इथे एका स्त्राrच्या मूर्तीरूपात दाखवलेली आहे. शिवाच्या वरच्या डाव्या हाताजवळ एक प्राणी दिसतो. बहुधा ते हरीण असावे. या शिल्पाच्या वर दोन्ही बाजूंना विद्याधर दाखवले असून देवाच्या बाजूला दोन भक्त एका गुडघ्यावर बसलेले असून त्यांनी एक हात उंचावलेला आहे. या भक्तांच्या मागे दोन ऋषी दिसतात. देवाच्या गळ्यात यज्ञोपवीत असून नेसूच्या वस्त्राच्या चुण्या फारच आकर्षक आहेत. खूप बारकाव्यानिशी कोरलेले हे शिल्प बघण्यासाठी ही लेणी बघायला यायला हवीत. या शिल्पाची जी चौकट आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबांवर आणि या लेणीतल्या इतर खांबांवरसुद्धा ग्रंथलिपीमधील शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखात या लेणीचे ‘ललितांकुर’ हे नाव आणि महेंद्रवर्मनचा उल्लेख केलेला आहे. याशिवाय या लेणीच्या एका भिंतीवर 16-17 व्या शतकातील शिलालेख कोरलेले आहेत. हे शिलालेख बघताना एखादे भलेमोठे इतिहासाचे पुस्तकच आपल्या समोर उघडून ठेवले आहे असे वाटते.

लयनकला आणि शिल्पकलेचा संगम इथे बघायला मिळतो. त्यामुळे त्रिचीला आल्यावर ही ठिकाणे न चुकता बघायला हवीत.

[email protected]