24 वर्षांपूर्वीची टीका; मेधा पाटकर दोषी; शिक्षेवर 30 मे रोजी युक्तिवाद

24 वर्षांपूर्वी केलेल्या भित्रा या टीकेसाठी दिल्लीच्या साकेत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोषी धरले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा मेधा पाटकर यांनी 2001 मध्ये चांगलाच समाचार घेतला होता. सक्सेना हे देशभक्त नसून भित्रे आहेत, असा थेट आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. हा आरोप म्हणजे बदनामी असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले आहे.

महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी हा निकाल दिला. मेधा पाटकर यांना आयपीसी कलम 500 अंतर्गत दोषी धरण्यात आले आहे. या गुह्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद आहे. मेधा पाटकर यांना किती शिक्षा ठोठवावी यावर 30 मे 2024 रोजी युक्तिवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करेल.

बदनामीच्या हेतूने टीका
बदनामीच्या हेतूनेच मेधा पाटकर यांनी सक्सेना यांच्यावर टीका केली. मेधा पाटकर यांच्या आरोपाने सक्सेना यांची प्रतिमा मलिन झाली. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला. जनमानसात त्यांच्याविषयी चुकीचा समज निर्माण झाला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मेधा पाटकर त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करू शकल्या नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण
नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक मेधा पाटकर यांनी 25 नोव्हेंबर 2000 रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. देशभक्ताचा खरा चेहरा या नावाने हे प्रसिद्धी पत्रक होते. सक्सेना हे देशभक्त नसून भित्रे आहेत. हवाला रॅकेटमध्ये सक्सेना यांचा हात असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला होता. सक्सेना यांनी 2001 मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात मेधा पाटकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला. 2003 मध्ये दिल्लीच्या साकेत महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा खटला चालला. दोन दशकांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले.