50 लाखांच्या गुटख्याची वाहतूक, बापलेकाला सशर्त जामीन

तब्बल 50 लाख रुपयांच्या गुटख्याच्या वाहतुकीचा आरोप असलेल्या बापलेकाला उच्च न्यायालयाने सर्शत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे अटकपूर्व जामीनाची याचिका प्रलंबित असताना अटक झाल्यास या दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

गुलशन कुमार शर्मा व त्याच्या मुलाने अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली आहे.  न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या सुट्टीकालीन एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. शर्मा व त्याच्या मुलाने 28 व 29 मे 2024 रोजी नारपोली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. तपासात सहकार्य करावे, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 4 जुलै 2024 रोजी होणार आहे.

न्यायालयाचे निरीक्षण

पोलिसांनी 50 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. तपासातील हा महत्त्वाचा मुद्देमाल आहे. शर्माकडून काही जप्त करण्यात आलेले नाही. शर्मा व त्याच्या मुलाला अंतरिम जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

4 एप्रिल 2024 रोजी पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणाया ट्रकवर धाड टाकली. यामध्ये 50 लाख 25 हजार 600 रुपयांचा गुटखा होता. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. शर्माच्या सांगण्यावरुन गुटख्याची वाहतूक केली जात होती हे तपासात उघड झाले. यात होणारी अटक टाळण्यासाठी शर्मा व त्याच्या मुलाने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली. न्यायालयाने या दोघांनीही अटकपूर्व जामीन मंजूर केला.