श्री विठ्ठल-रखुमाईचे 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन

येत्या 2 जूनपासून वारकरी भाविकांना आपल्या लाडक्या श्री विठ्ठल-रखुमाईचे पदस्पर्श दर्शन पुन्हा घेता येणार आहे. मंदिरसंवर्धनाच्या कामासाठी गेल्या तीन महिन्यांपासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासनाकडून मंदिरसंवर्धनाच्या कामासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिराचे काम सुरू करण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने पहाटे 5 ते सकाळी 11 या वेळेत श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू ठेवले होते. आता विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱयातील काम पूर्ण झाले आहे. यामुळे 2 जूनपासून दर्शनरांगेतील भाविकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पाद्यपूजा करून पदस्पर्श दर्शनास सुरुवात करण्यात येणार आहे.