रंगभूमी – थिएटर व्हिलेज

>> अभिराम भडकमकर

रंगभूमीवर निर्माण झालेले सर्व कलात्मक आविष्कार आपल्या मनाला आनंद देतात. या आनंदाची आपल्याला माणूस म्हणून एक गरज असते आणि म्हणूनच तिपांतर हा आपलं माणूसपण जपणारा नाटय़ महोत्सव बनला आहे…

कल्लोल भट्टाचार्य यांचा ‘तिपांतर’ नाटय़ महोत्सवाला आमंत्रण करण्यासाठी फोन आला, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर सर्वसाधारणपणे असतो त्या पद्धतीचा नाटय़ महोत्सव होता. सातकाहुनिया असं कधी न ऐकलेलं गावाचं नाव आणि आमंत्रण पत्रिकेतल्या ‘थिएटर व्हिलेज’ या शब्दाला मी थोडासा अडखळलो. पण बोलपूर म्हटल्यावर कविगुरू रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतन डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यामुळे लगेच होकार भरला. आज लिहिणार आहे, ते या ‘थिएटर व्हिलेज’ या संकल्पनेबद्दलच.

आपल्याकडचं दौऱयाचं नाटक हे अंगवळणी पडलेलं. पण हा नाटय़ महोत्सव होतो तो एका थिएटर व्हिलेजमध्ये. कल्लोल या नाटय़वेडय़ा माणसाने काही एकर जमीन विकत घेतली. तिथे शेती आणि शेतीशी संबंधित काही छोटेसे उद्योग पोल्ट्री वगैर सुरू केले. माणसे जमवली आणि या सगळ्यांच्या सहाय्याने तिथे नाटक सुरू केले. एक मोठं असं बॉक्स थिएटरसारखं रंगमंदिरही उभारलं आणि ते नाटय़विषयक घडामोडींचं एक केंद्रच होऊन बसलं. गेली 14 वर्षं हा नाटय़ महोत्सव सलग अखंडपणे होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये या नाटय़ महोत्सवाने आता चांगलंच नाव कमावलं आहे. तो खऱया अर्थाने राष्ट्रीय झाला आहे. या थिएटर व्हिलेजमध्ये नाटकाच्या तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. आपल्याला आपला संपूर्ण संच घेऊन जायचं असेल तर तिथे जाऊन तालमीसाठी आणि वास्तव्यासाठीही काही कॉटेजेस तयार केलेली आहेत. म्हणजे डोक्यात एक नाटकाची कल्पना आणि नाटकाचा चमू घेऊन जायचं आणि येताना तयार नाटक घेऊन यायचं.

‘तिपांतर’च्या या बॉक्स थिएटरमध्ये गेली 14 वर्षं देशभरातल्या वेगवेगळ्या नाटय़ संस्थांनी हजेरी लावली आहे. या वर्षी त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या प्रकारची नाटकं पाहायला मिळाली. ‘कर्णगाथा’ आणि ‘निर्माण से निर्वाण तक’ ही भारतेंदू नाटय़ अकादमीची नाटके तर भूमिसुता या तरुण रंगकर्मीने केलेले नाटकही पाहायला मिळाले. मला या पद्धतीची नाटकाची कल्पना खूपच विलक्षण आवडून गेली. व्हिलेज थिएटर ही संकल्पना पाश्चात्त्य देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, पण हिंदुस्थानमध्ये ती फार क्वचित राबवली जाते. ही माणसे 24 तास ‘नाटक’ या एकाच कल्पनेभोवती रमलेली असतात. नाटक जगत असतात.

‘कर्णगाथा’ हे महाभारतावरील कर्ण ही व्यक्तिरेखा मध्यभागी ठेवून केलेलं नाटक, परंतु त्याचा सगळा बाज मात्र काबुकी थिएटरच्या वेशभूषा आणि मुखवटय़ांच्या सहाय्याने उभा केलेला. लक्ष वेधून घेतलं ते ‘निर्माण से निर्वाण तक’ या नाटकांनी. गौतम बुद्धांच्या आयुष्यातील उत्तरार्धात निर्माण झालेल्या काही तात्त्विक आणि वैचारिक घुसळणीचं हे नाटक तत्त्वज्ञानाला संघटनेचं कधी गोंदण होतं, तर कधी कुंपण! अशा विचाराभोवती घुटमळणारं भारतेंदू नाटय़ अकादमीचं हे नाटक.

ही संस्था गेली काही वर्षे बिपीन कुमार यांच्या नेतृत्वाखाली कात टाकून झळाळी प्राप्त झाल्यासारखी उभी झाली आहे. नुकतीच बिपीन कुमार यांनी झगडून तिथे ‘रेपर्टरी’ (म्हणजे रंगमंडल) पुन्हा सुरू केलं. जे गेली काही वर्षं खंडित झालं होतं. आता या ‘रेपर्टरी’ने स्वतची एक बसही घेतलेली आहे, आणि याच ‘रेपर्टरी’च्या कलावंतांनी सादर केलेली ही दोन नाटकं होती. बिपीन कुमार यांच्या कल्पक दिग्दर्शनाने या नाटकातील वैचारिक बाजू कलात्मकतेने मांडली आहे. नेपथ्यापासून ते अभिनयापर्यंत सर्व बाजू सशक्त होत्या. या महोत्सवामध्ये एक बाहुली नाटय़ही पाहायला मिळालं. एकूण विविध प्रकारचे विषय आणि विविध प्रकारचे फॉर्म्स हाताळणारा तिपांतर नाटय़ महोत्सव एक वेगळ्या प्रकारचा कलात्मक अनुभव देऊन गेला. 44 डिग्री अशा रणरणत्या उन्हामध्ये या नाटय़ महोत्सवाला पंपोशीतले गावकरी संध्याकाळी हजेरी लावताना पाहून आश्चर्य वाटत होतं. खरं तर तिथे पोहोचल्यानंतर इथे नाटक होईल. कारण कलावंत दिसत आहेत, तंत्रज्ञ आहेत, पण प्रेक्षक… ते कुठून येणार? असा प्रश्न पडला होता. परंतु खचाखच भरलेले ते बॉक्स थिएटर याच गोष्टीची साक्ष देत होतं की, तिपांतरने आजूबाजूच्या लोकांना नाटकाचं वेड लावलं आहे. नाटक बघणं हा त्यांच्या आयुष्याचा आता एक महत्त्वाचा आणि सुंदर असा भाग होऊन बसला आहे. कल्लोल भट्टाचार्य आणि त्यांच्या सर्व सहकाऱयांना यासाठी खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत. मधल्या काळामध्ये त्यांच्यावर काही अस्मानी आणि काही सुलतानी संकटंसुद्धा आली. पण त्या संकटांचा मुकाबला करत तिपांतरने आपली वाटचाल चालू ठेवली आहे.

कोलकात्याच्या प्रवासामध्ये हा एक मोठा अनुभव होता. मातीतून बीज पेरून निर्माण करायचं ते आपल्या पोटाला आनंद देतं आणि रंगभूमीवर निर्माण झालेले हे सर्व कलात्मक आविष्कार आपल्या मनाला आनंद देतात. या दोन्ही आनंदाची आपल्याला माणूस म्हणून गरज असते आणि म्हणून तिपांतर हा आपलं माणूसपण जपणारा नाटय़ महोत्सव आहे, असं म्हणायला हरकत नाही.

संस्कृतीचा भाग असलेल्या जत्रेमध्ये आकाश-पाळणा असतो. आकाश-पाळण्यात बसल्यानंतर वरून खाली येताना खूप भीती वाटते. आपण खाली पडू असा भास होतो. पण तरीही भीती वाटायला लावणाऱया त्या भीतीचा आनंद वा अनुभव देणाऱया आकाश-पाळण्यात पैसे देऊन लोकांना बसायला आवडतं. कारण काही जणांना ती भीती, तो भास आवडतो. त्याचप्रमाणे ‘शैतान’ हा चित्रपट त्या व्यक्तींकरता आहे ज्यांना भयावह संगीत, भीतीदायक दृश्ये, अंगात येणे, काळी जादू, अमावस्येची रात्र, विजांचा कडकडाट, लपलेला खुनी… यासारखं काही पाहून छातीत होणाऱया धडधडीचा आनंद अनुभवण्याकरिता ‘शैतान’ पहा.

 [email protected]

(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)