मनतरंग – आज, आत्ता!

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

समस्येचा सामना करीत असलेल्या व्यक्तींना भूतकाळात घडलेल्या दुःखद आणि नकारात्मक गोष्टी सतत आठवत राहतात. त्याबरोबरच ते त्या गोष्टी कशा टाळू शकल्या असते या विचारांच्या गर्तेत अडकून जातात. त्यामुळे अशा व्यक्तींना स्वतलाच या नकारात्मक विचारांमधून बाहेर पडणं कठीण होतं आणि सतत तोच विचार केल्याने अतिविचार आणि त्याबरोबर होणारे परिणाम या अधिकच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

कांचन (नाव बदलले आहे) फोनवर तिच्या नवऱयाची, रजतशी (नाव बदलले आहे) जोरजोरात बोलत होती. तिचा स्वर टिपेला पोहोचला होता. त्या क्षणी तिला काही गोष्टींचा जणू सोक्षमोक्षच लावायचा होता. मेट्रोमधील प्रवासीही तिच्याकडेच बघत होते. त्यांचं ते तिला निरखणं बघताच कांचन भानावर आली आणि तिने पटकन मोबाइल ऑफ केला. तिचं स्टेशन येतच होतं. प्रवाशांच्या नजरांचा सामना करीतच ती उतरली आणि स्टेशनवर एका बेंचवर बसून राहिली. तिला सगळा भूतकाळ झरझर आठवत होता. अगदी काल घडल्यासारखा…!

कांचनचा रजतबरोबर पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांची शाळेपासूनची ओळख. त्यामुळे दोन्ही घरांतून बिनविरोध दोघांच्या लग्नाला परवानगी मिळाली. लग्नानंतरची नवी नवलाई संपली आणि दोघेही स्वतच्या करीअरवर लक्ष देऊ लागले होते. रजतचं कुटुंब हे शिस्तीचं होतं. त्यात प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी होती. घरामध्ये मोकळीक आणि आपापसांत सुसंवाद होता. याउलट कांचनच्या घरी तिचे वडील एकहाती घरचा कारभार चालवत होते. ते कोणाचंही मत विचारात न घेता त्यांच्या मनाला वाटेल तसे निर्णय घेत असत. या कारणामुळे तिच्या घरात सतत भांडणं होत. आई-वडील आणि कांचनमध्ये एक अव्यक्त अढी होती.

हे असे ताणतणाव घेऊन तिने या घरात पाऊल ठेवलं होतं. `घरातील सदस्य एकमेकांचे मत विचारात घेतात’ हे तिच्या पचनी पडतच नव्हतं. नात्यांवरचा अविश्वास आणि अबोल स्वभाव यामुळे कांचन या नवीन आणि सकारात्मक वातावरणात रुळायला तयार होत नव्हती. ती कायम सासरच्या लोकांच्या वागण्याचा, तिलाही जबाबदाऱयांत सामील करून घेण्याचा उलट अर्थ काढू लागली. त्या दिवशी तर या सगळ्याचा विस्फोटच झाला. कांचनला तिच्या सासऱयांबरोबर बँकेत जायचं होतं. ती फायनान्समध्ये असल्याने घरी कायम तिचा सल्ला घेतला जाई, पण काही कारणास्तव ती विसरली आणि नेहमीप्रमाणे लवकर ऑफिसला गेली. सासरे तिला काही बोलले नाहीत, पण ऑफिसात गेल्यावर त्यांनी तिला आठवण करून दिली. कांचनला तिच्या नकळत झालेल्या चुकीबद्दल वाईट वाटलं. तिने दिलगिरी व्यक्तही केली. मात्र त्यानंतर तिला रजतने फोन केला आणि तिच्या बेफिकीरीबद्दल सुनावलं. अर्थातच तिला ते सहन झालं नाही आणि त्याचे पर्यवसान भांडणात झालं.

समुपदेशन सत्रात आलेले कांचन आणि रजत या सगळ्या घटना सांगत होते. `’मॅम, तुम्हाला सांगतो. आमच्या घरात इतकं मोकळं वातावरण आहे की, सगळ्यांनाच आमच्याकडे कायम यावंसं वाटतं, पण कांचनला फक्त नकारात्मक आठवणी आणि घटनाच आठवत राहतात. मी काय नोकर आहे का? इथपर्यंत तिचे विचार जायचे. नंतर ती रुळली. पण मध्येच कधीतरी तिचं रडगाणं चालू राहतं आणि ती त्याच झोनमध्ये शिरते. कांचन मध्येच त्याला तोडत म्हणाली, `’मी सुरुवातीलाच आवाज उठवला म्हणून तुझ्या घरचे व्यवस्थित तरी माझ्याशी बोलायला लागले. नाहीतर मला सासुरवास पक्का होता… आणि शेवटी सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही! तुझे वडील तर बोलतात कसे? ए कांचन, चल बँकेत.”

`’मग कसं बोलायचं गं तुझ्याशी? कांचन सरकार, तुम्ही मला तुमचा अमूल्य वेळ द्याल का?” रजतचा सत्रामध्येच पारा चढला.

कांचनच्या रडण्याचा आवेग ओसरल्यानंतर तिने बोलायलाच सुरुवात केली… `’मला हल्ली काय झालंय समजत नाही. याच्या घरचे खरं तर खूप चांगले आणि समजूतदार आहेत. माझे सासू-सासरेही मला आता खूप सांभाळून घेतात, पण मी मात्र भूतकाळात घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे अजूनही उदास असते. मला माहीत आहे की, गेलेल्या गोष्टी आठवायच्या नाहीत, पण काही गोष्टी अशा मनावर कोरल्या गेलेल्या आहेत की, विसरता म्हटलं तरी विसरता येत नाहीत.”

`’तू इतकी दुखावली गेली आहेस. काही कारण घडलं होतं का?” असं तिला विचारताच ती आठवायला लागली आणि सांगू लागली…`’माझ्या माहेरी जर काही कोणाला दिलेली गोष्ट जमली नाही, तर माझे वडील त्या व्यक्तीचा अपमान करत. माझ्या आईने आणि मोठय़ा भावाने हे सगळं भरपूर सहन केलं होतं. मी पण खूप सहन करायचे. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना उलट सुनवायला लागले. त्यामुळे ते मला कमी बोलायला लागले. त्या वेळी मी शिकले की, स्वतसाठी आवाज उठवावाच लागतो.”

`’मान्य. तू त्या वेळेस तसं बोललीस, पण जेव्हा तुझ्या सासरचे तुला असंच बोलायचे तेव्हाही तुला तसाच राग यायचा…” हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच कांचन म्हणाली, `’नाही. माझ्या सासरच्यांनी माझ्या बाबांसारखा माझा कधीही अपमान केला नाही.” हे बोलताना ती थांबली.

`’तू रजतला बाबांसारखा तुला अपमानित करणारा म्हणून पाहत तर नाहीस ना…” एवढं बोलल्यानंतर तिने चमकून वर पाहिलं आणि हळूच होकारार्थी मान हलवली.

आता समुपदेशन सत्र काहीसं सोपं झालं होतं. कांचन ज्या समस्येचा सामना करत होती ती समस्या होती `नकारात्मक प्रभावांचा होणारा मानसिक त्रास’ (ज्याला `निगेटिव्ह अफेक्ट सिंड्रोम’ म्हटलं जातं, पण यासाठी मानसोपचार तज्ञांद्वारे निदान होणं गरजेचं आहे.) ज्यामुळे आता वर्तमानात राहताना नैराश्य, चिडचिड, रागाचा उद्रेक या भावना सतत तिच्या मनात असायच्या आणि त्याचा परिणाम तिच्यावर आणि घरावर, तिच्या आणि रजतच्या नातेसंबंधांवर होत होता.

या समस्येचा सामना करीत असलेल्या व्यक्तींना भूतकाळात घडलेल्या दुःखद आणि नकारात्मक गोष्टी सतत आठवत राहतात. त्याबरोबरच त्या गोष्टी कशा टाळू शकल्या असत्या याही विचारांच्या गर्तेत अडकून जातात. त्यामुळे अशा व्यक्तींना स्वतलाच या नकारात्मक विचारांमधून बाहेर पडणं कठीण होतं. हे दुष्टपा आहे.

रजतला आणि कांचनला या सगळ्या गोष्टींची समज देण्यात आली. तसंच मानसोपचाराचा सल्लाही देण्यात आला, ज्यायोगे कांचनला त्याचा फायदा होऊ शकेल. त्यासोबतच दोघांचेही वैयक्तिक समुपदेशन सुरू झाले. त्यात दोघांनाही या समस्येचा तटस्थपणे कसा सामना करता येईल यासाठी मार्ग सुचवण्यात आले. कांचनच्या वैयक्तिक सत्रांत रागाचे नियोजन, अतार्किक विचारांचा प्रभाव कसा कमी करायचा यावर भर देण्यात आला. रजतला वैयक्तिक सत्रांत तिच्या समस्येबाबत कल्पना देण्यात आली होतीच. त्याशिवाय त्याला तिची स्पेस देण्यास सांगण्यात आले, ज्यायोगे तिला स्वतवर काम करणं सोपं जाईल आणि दोघांच्याही नात्यांमध्ये अजूनच मोकळेपणा येईल. आज कांचन सावरते आहे आणि त्यात तिला रजतचीही साथ मिळते आहे. तिच्यामध्ये `मी कृतज्ञ आहे’ ही विचार प्रणाली रुजायला लागली आहे.

[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)