सत्याचा शोध – छिद्रे अंधश्रद्धेची!

>> चंद्रसेन टिळेकर

आपल्यासारख्या मागासलेल्या देशात प्रबोधनाचा प्रयत्न करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखेच आहे. पण समाज सुधारकांनी न थकता अनेक पातळींवर समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले. आपल्या समाजात समस्या निर्माण होण्याचे कारण आपल्या अंधश्रद्धाच आहेत हे त्यांनी जाणले. अंधश्रद्धा हे विकासाच्या गाडग्याला पडलेले भोक आहे. जोपर्यंत तुम्ही ते भोक बुजवत नाही तोपर्यंत तुम्ही वरून विकासाचं पाणी कितीही ओता, ते गाडगं कधीच भरले जाणार नाही. हे जेव्हा बदलेल तेव्हा आपल्या समस्या खऱया अर्थाने कमी होतील.

आपल्या समाजात जे समाज सुधारक होऊन गेले त्यांच्याबद्दल मला कमालीचा आदर वाटतो. मग ते चार्वाक असो, बसवेश्वर, महात्मा फुले-सावित्रीबाई असो किंवा शाहू राजे, आंबेडकर, आगरकर असो वा ‘अनिस’चे डॉ. दाभोलकर! ही सगळी मंडळी तशी सुखवस्तूच होती. लष्कराच्या भाकऱया भाजण्याची त्यांना काही गरज नव्हती. आपल्यासारख्या मागासलेल्या देशात प्रबोधनाचा प्रयत्न करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखेच आहे. पण ही मंडळी न थकता पोहत राहिली. इथे मला प्रकर्षाने जोतिबा आणि सावित्रीबाईंची आठवण येते. अत्यंत सुखवस्तू घराण्यातले हे जोडपे. जोतिबा तर गावातले मोठे कंत्राटदार होते. लोकांचे शिव्याशाप खाऊन, नव्हे चक्क दगडधोंडे खाऊन समाजकार्य करण्याची त्यांना काहीही आवश्यकता नव्हती. एकदा याच विषयावर मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला,

”तुला काय वाटतं अंधश्रद्धा फक्त आपल्याच देशात आहे का?”

”छे, असं मी मुळीच म्हणणार नाही. काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो असताना तिथले दुकानदार संध्याकाळी दुकानाच्या बाहेर पणतीसारखा दिवा ठेवतात. संध्याकाळी दुष्ट शक्ती दुकानात येऊ नये म्हणून.”

”आपल्या देशात एवढे प्रश्न असताना ते सोडवायच्या ऐवजी आपण अंधश्रद्धेसारख्या तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर वेळ घालवतोय असं नाही का तुला वाटत?”

” मग तुझ्या मते अंधश्रद्धा निर्मूलनापेक्षा कोणता प्रश्न किंवा कोणते प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत?”

”अरे, प्रचंड लोकसंख्या आणि दिवसेंदिवस माजत चाललेली लाचलुचपत या आपल्या देशासमोरच्या मोठय़ा समस्या वाटत नाही तुला?”

”त्या निश्चितच मोठय़ा समस्या आहेत.”

”नशीब, एवढं तरी मान्य करतोयस.”

‘पण त्या समस्या निर्माण होण्याचं कारणच मुळी आपल्या समाजातल्या अंधश्रद्धाच आहेत त्याचं काय?”

”कोणत्या अंधश्रद्धा?”

”पहिली म्हणजे, मुले ही देवाची देणगी आहे. ती नाकारणं किंवा तिच्यात अडसर येईल असं वागणं म्हणजे देवाचा अपमान करणं, त्याचा कोप ओढवून घेण्यासारखं आहे. उत्तरेकडील राज्यात मग ते उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असो किंवा बिहार, ओडिशा अशी राज्यं असो. ही अंधश्रद्धा मोठय़ा श्रद्धेने, प्राण-प्रतिष्ठेने जपली जाते. साहजिकच तिथे आपण वाटेल तशी जनसंख्या वाढलेली पाहतो. एवढय़ा मोठय़ा जनसंख्येला रोजगार तरी कुठून आणायचा? मग शेवटी हवालदिल होऊन आपले घरदार सोडून त्यांना दुसऱया राज्यात विशेषत: औद्योगिकदृष्टय़ा चांगल्या स्थितीत असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा आसरा घ्यावा लागतो. परंतु बाहेरून आलेल्या या झुंडीमुळे त्या राज्यात आरोग्याचे, गुन्हेगारीचे असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात. म्हणजे केवळ एक अंधश्रद्धा जपल्याने किती प्रश्न निर्माण होतात ते पहा.”

”ठीक आहे, हे मान्य करावेच लागेल. इथले आमचे भूमिपुत्र ते उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहेतच की, काहीसे असहाय्य होऊन. पुन्हा राष्ट्रीय एकता जपायची म्हणून फार काही बोलता येत नाही.”

”आता कसं बोललास. यालाच म्हणतात, तोंड दाबून ब्क्कु्यांचा मार.”

”आणि ते लाचलुचपतीचं काय? तिच्या पाठीमागे कोणती अंधश्रद्धा आहे?”

”ती अंधश्रद्धा म्हणजे तमाम हिंदुस्थानींची आवडती श्रद्धा देव नवसाला पावतो.”

”पण या अंधश्रद्धेमुळे लाचलुचपत कशी बोकाळते?”

”अब आया उंट पहाड के नीचे,” मी थोडंसं सैल होऊन म्हटलं.

”हो पण देवाला नवस बोलण्याचा आणि लाचलुचपत वाढण्याचा काय संबंध ते सांग ना?”

”मला सांग तू देव मानतोस का?”

”म्हणजे काय, कोटय़वधी देशवासीयांप्रमाणे मीही देव मानतो. आता देव मुळी नाहीच, ती कवी कल्पना आहे असलं काहीबाही सांगून माझी शाळा घेऊ नकोस.”

”नाही घेत, पण देव नवसाला पावतो असं तुला वाटतं का?”

”मला नाही तसं वाटत.”

”तुला नाही वाटत तसं कारण तू थोडा तरी विवेकाने चालणारा आहे. पण आपल्या कोटय़वधी अल्पशिक्षित बांधवांचं काय? देवाला काहीतरी कबूल केलं की, देव आपलं काम करतो यावर आपल्या देशबांधवांची गाढ श्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा केवळ देवापुरती मर्यादित नाही तर दैनंदिन व्यवहार करतानाही तिने आपल्या मनात ठाण मांडलेले असते. म्हणूनच मग आपण कुठल्याही कचेरीत आपलं काम करून घेण्यासाठी गेलो की, मग ती सरकारी-निमसरकारी असो अथवा एखादी खासगी आपण समोरच्या कर्मचाऱयाला काही दिल्याशिवाय आपले काम करणार नाही या भावनेने तो काही न मागताच त्याच्या टेबलाखालून त्याला लाच देतो. या नवसाचे आणखी विद्रूप स्वरूप म्हणजे देवाला एखाद्या प्राण्याचा बळी देण्याचा नवस बोलणे. या अंधश्रद्धेमुळे काळूबाईला प्राण्यांचा बळी देताना 300 भक्तांचा बळी गेला होता हे तुला आठवत असेलच.”

”नक्कीच आठवतंय आणि तुकोबांचा नवसांचा खिल्ली उडवणारा अभंगही आठवतो. तो म्हणजे, अरे नवसाये पुत्र होती, तर का करावा लागे पती?”

”लाख मोलाचे वचन आहे बघ तुकोबांचे. मला तर नेहमी वाटत आलेलं की, अंधश्रद्धा हे विकासाच्या गाडग्याला पडलेलं भोक आहे. जोपर्यंत तुम्ही ते भोक बुजवत नाही तोपर्यंत तुम्ही वरून विकासाचं पाणी कितीही ओता, ते गाडगं कधीच भरलं जाणार नाही.”

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)