ताडोबाच्या बफर झोनमध्ये 26 पट्टेदार वाघांचे दर्शन

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणीगणनेत विविध प्राण्यांची नोंद घेण्यात आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पार पडलेल्या निसर्ग अनुभव उपक्रमात सहा वन परिक्षेत्रात 26 पट्टेदार वाघ, 8 बिबटे, 403 चितळ, 344 रानगवे, 363 रानडुक्कर, 340 वानरे अशा एकूण 1 हजार 917 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली.

ताडोबा ‘बफर’ क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वन परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील 79 मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली होती. ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी केलेले 160 निसर्गप्रेमी व 80 गाईड या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकांकडून चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले होते.

बुद्ध पौर्णिमेला 23 मे रोजी सायंकाळी चार वाजता निसर्गप्रेमींना जिप्सीद्वारे मचाणाजवळ सोडण्यात आले होते. ताडोबा व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नोंदीनुसार या उपक्रमात सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना 26 पट्टेदार वाघ व 8 बिबटय़ांनी दर्शन दिले. यामध्ये मुल व शिवनी वन परिक्षेत्रमध्ये प्रत्येकी 7 वाघांची नोंद घेण्यात आली. मोहुर्लीमध्ये 4, खडसांगी 2 व पळसगावमध्ये एका वाघाची नोंद घेण्यात आली. खडसंगी वन परिक्षेत्रमध्ये सर्वाधिक 511 वन्य प्राण्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यानंतर मोहुरली 481, मूल 341, शिवणी 216, पळसगाव 122, चंद्रपूर 146 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली. तलावाशेजारी असलेल्या तसेच पाणवठय़ाच्या शेजारच्या मचाणावर बसून असलेल्या निसर्गप्रेमींना पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघ व बिबटय़ाचे मनसोक्त दर्शन घेता आले, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. कारण साडेचार हजार रुपये शुल्क भरल्यानंतरदेखील अनेकांना वाघ किंवा इतर वन्य प्राण्यांचे दर्शन झाले नाही. त्यामुळे अनेकांना निराश होऊन परतावे लागले.

या प्राणीगणनेत सर्वाधिक 21 नर वाघ नोंदविण्यात आले. तसेच केवळ 8 बिबटय़ांची नोंद घेतली गेली. त्यानंतर 403 चितळ, 344 रानगवे, 363 रानडुक्कर, 340 वानर, सांबर 166, चौशिंगा 8, भेडकी 18, नीलगाय 34, रानकुत्रे 17, अस्वल 34, जवादी मांजर 2, उदमांजर 4, रानमांजर 3, सायळ 1, मुंगूस 10, मोर 97, खवल्या मांजर 9 व इतर वन्यप्राणी 32 अशी नोंद घेण्यात आली. कोल्हा, तरस व चिंकारा दिसले नाही. एकूण 1 हजार 917 वन्य प्राण्यांच्या नोंदी या उपक्रमअंतर्गत घेण्यात आल्या.