मोदी सरकारची खिसेकापूगिरी; वर्षाला 7 हजारच्या सवलती, लुबाडतात 89 हजार!

मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून देशातील जनतेची खिसेकापूगिरी चालवली आहे. हिशोब मांडला तर वर्षाला किमान 96 हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून लुबाडण्यात येत असून केवळ सात हजार रुपयांच्या सवलती लोकांना दिल्या आहेत. म्हणजेच मोदी सरकारने दरवर्षी 89 हजार रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे. आरबीआयकडून दरवर्षी लाभांशच्या नावाखाली टेकू घेणाऱ्या मोदी सरकारने जीएसटी आकारून लघुउद्योग संपवले. शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव नाही, महागाई गगनाला भिडलेली असताना मोदी सरकार म्हणते अच्छे दिन आलेत आणि रामराज्य आणू… पण प्रत्यक्षात महागाईमुळे सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले असून हीच का मोदींची गॅरंटी, असा सवाल देशातील अर्थतज्ञ आणि शेतकरी नेत्यांनी केला आहे.

गृहिणींच्या किचनमध्ये भडका

महागाई दिवसेंदिवस वाढल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट अक्षरशः कोलमडले असून किचनमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. डाळींच्या किंमती 100 रुपयांनी वाढल्या असून तांदूळ किलोमागे 40 रुपये, गव्हाचे पीठ किलोमागे 15 रुपये, मुलाबाळांच्या वह्या-पुस्तकांत दरवर्षी दोन हजार रुपये, चप्पल, बूट सरासरी 400 रुपये, तर एक जोड कपडे सरासरी 500 रुपयांनी महागले. अशाप्रकारे सरकार दरवर्षी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून 96 हजार रुपयांची खिसेकापूगिरी करत असल्याचे समोर आले आहे. यूपीए सरकारच्या काळात सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती इराणी आता कुठे आहेत, असा सवाल देशातील जनता करत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नफ्यावर

जनतेचा अधिकार

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या नफ्यावर जनतेचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. परंतु, मोदी सरकारने या बँकेवर आपला हक्क दाखवत सातत्याने जनतेचा हा पैसा लुबाडल्याचेच समोर आले आहे. सरकारची रिझर्व्ह बँकेवर मालकी असली तरी तो जनतेचा पैसा हे मोदी सरकार सोयिस्कररीत्या विसरल्याचेच रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेल्या 2.11 लाख कोटींच्या लाभांशावरून उघड झाल्याकडे अर्थतज्ञांनी लक्ष वेधले आहे.

जीवनावश्यक वस्तू महागल्या

डाळी, साखर, ज्वारी यांच्या किमती 10 ते 15 रुपयांनी  वाढल्याची माहिती दुकानदार चुन्नीलाल चौधरी यांनी दिली. मोदी सरकारला सर्वसामान्यांचे काहीच पडलेले नाही, अशा शब्दांत गृहिणी शैलेजा करपे यांनी संताप व्यक्त केला.

महागाईचे गणित (प्रति किलो)

  वस्तू        आधा  आता

  तूरडाळ       165     175

  मूगडाळ      115     120

  उडीद डाळ  122     130

  चणाडाळ     68       80

  ज्वारी         34       48

  साखर         40       45

  तांदूळ         28       35

मधल्या माणसांसाठी मोदी सरकार

गरीब शेतकरी व्यापाऱ्यांना म्हणजेच मधल्या माणसांना माल विकतो. तो माल बाजारात येईपर्यंत त्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. शेतकरी व्यापाऱ्यांना कांदा 10 रुपये किलो दराने विकतो. तोच कांदा बाजारात येईपर्यंत 50 रुपयांवर जातो. हेच तर मोदी सरकारचे धोरण आहे, असा आरोप अर्थतज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी केला.

सर्वसामान्यांसाठी सरकारकडे वेळ आणि पैसाही नाही

खते, बी-बियाणे, कीटकनाशके महाग करून ठेवली आहेत, तर दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा आहेच. दुष्काळ पडलाय, शेतकरी आत्महत्या करतोय, पण त्याचे सरकारला काहीच सोयरसुतक नाही. उलट उद्योगपतींच्या तुंबडय़ा भरल्या जाताहेत. त्यांना गरीबांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पैसा नाही… हीच का मोदींची गॅरंटी, असा सवालही डॉ. नवले यांनी केला.

उद्योगपतींची भरभराट हीच मोदींची गॅरंटी

मोदींच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 1100 रुपयांवर गेली, तर पुन्हा मोदी सरकार आले तर गॅसच्या किमती दीड हजारांच्या घरात जाण्याची आणि पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतींचाही भडका उडण्याची भीती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकरीविरोधी धोरणे राबवल्याचा आरोप शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

मेट्रो, बुलेट ट्रेनसाठी पैसे, पण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काय?

विकास झालाच पाहिजे; परंतु मेट्रो, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांसाठी 1 लाख 80 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते. पण, सर्वसामान्य मुंबईकर लोकल प्रवाशांना सुविधा दिल्या जाताहेत का याचाही विचार व्हायला हवा. आज मेट्रोतून जाताना 50 रुपयांहून अधिक तिकिटासाठी खर्च करावा लागतो, त्यामुळे अनेकजण लोकलचा पर्याय निवडतात. मात्र  लोकलमधून पडून लोक मरताहेत, लोकलची गर्दी कमी झालेली नाही त्यावर उपाययोजना नाहीत. सर्वसामान्य कर्मचारी, कामगार, मजुरांनी मुलाबाळांना दरवर्षी पुस्तके खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणायचे? जे पैसे आहेत त्यात शाळेचा खर्च भागत नाही. हेच का अच्छे दिन, हीच का मोदींची गॅरंटी, असा सवाल चंद्रशेखर प्रभू यांनी केला.

वाराणसीत इंडिया आघाडीचे तुफान!

उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची लाट पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसीतही विरोधी वारे वाहत असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या रोड शोला शनिवारी अलोट गर्दी उसळली.