नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; ‘नियम व अटी लागू’, ‘डबल लाईफ’ ठरले सर्वोत्कृष्ट!

अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. व्यावसायिक नाटक पुरस्कार ‘नियम आणि अटी लागू’ या नाटकास, तर संगीत नाटक पुरस्कार ‘डबल लाईफ’ या नाटकास जाहीर झाला. प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीत नाटक पुरस्कार ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकास, तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक पुरस्कार ‘आय एम पुंगळय़ा शारूक्या आगीमहूळ’ या नाटकास जाहीर करण्यात आला. सर्व विजेत्यांना 14 जून रोजी माहीम येथील यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे दरवर्षी 14 जून रोजी गो. ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. या पुरस्कारांसोबतच प्रतिवर्षी व्यावसायिक व प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील सर्व विभागांतील कलावंत, तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचे व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार संकर्षण कऱहाडे (नियम व अटी लागू) यांना, तर व्यावसायिक दिग्दर्शकाचा पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी (नियम व अटी लागू) यांना जाहीर झाला. नेपथ्यकार विभागाचा पुरस्कार संदेश बेंद्रे (217 पद्मिनी धाम) यांना, तर प्रकाशयोजना पुरस्कार अमोघ फडके (जर तरची गोष्ट) यांना देण्यात येणार आहे. पार्श्वसंगीतकार पुरस्कार सौरभ भालेराव (आजीबाई जोरात) आणि रंगभूषाकार पुरस्कार उल्लेश खंदारे (कुर्र) यांना जाहीर झाला.

– व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कऱहाडे (नियम व अटी लागू), तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लीना भागवत (इवलेसे रोप) ठरली. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मयूरेश पेम (ऑल द बेस्ट), तर विनोदी अभिनेत्री म्हणून शलाका पवार (हीच तर फॅमिलीची गंमत) यांना गौरविण्यात येणार आहे. आशुतोष गोखले (जर तरची गोष्ट) आणि पर्ण पेठे (चारचौघी) हे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते ठरले.

– प्रायोगिक नाटकासाठी प्रशांत निगडे (आय एम पुंगळय़ा शारूक्या आगीमहूळ) आणि बकुळ धवने (दी फिअर फॅक्टर) सर्वोत्कृष्ट कलाकार ठरले. प्रायोगिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार विवेक बेळे (यह जो पब्लिक है) यांना जाहीर झाला. प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता विशारद गुरव (संगीत जय जय गौरीशंकर) आणि सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री शारदा शेटकर (संन्यस्त खड्ग) ठरली. सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार इरफान मुजावर यांना जाहीर झाला.