भाईंदरजवळ चक्काजाम; वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर न केल्यामुळे ट्रफिकचा जांगडगुत्ता

घोडबंदर मार्गावर काजूपाडा ते गायमुख या भागात रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे भाईंदरच्या फाउंटन हॉटेल पासून ते मुंबई अहमदाबाद मार्गावर शनिवारी ट्रफिकचा अक्षरश: जांगडगुत्ता झाला. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने फाऊंटन हॉटेलजवळून ठाणे, वसई, विरार, नायगावकडे जाणाऱया नागरिकांचा अक्षरशः घामटा निघाला. वाढलेले तापमान, डोक्यावर तळपणारा सूर्य आणि वाहतुकीचा चक्रव्यूह यामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले. दहा मिनिटाच्या अंतरासाठी त्यांना दीड तास ट्रफिक मध्ये अडकून राहावे लागले.

घाटात रस्त्याचा चढ कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्यासाठी या मार्गावर जड आणि अवजड वाहनांना 15 दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर न केल्यामुळे भाईंदरजवळ मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली.

घोडबंदर मार्गावर काजूपाडा ते गायमुख या घाटभागाच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या मार्गावर शुक्रवारी रात्रीपासून जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही प्रवेशबंदी येत्या 7 जूनपर्यंत लागू असणार आहे. घाटातील 600 मीटर लांबीच्या रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घाटातील रस्त्याचा चढही कमी केला जात आहे.

या कामांसाठी भाईंदरकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गुजरातकडून ठाणे, नवी मुंबईत येणाऱ्या जड-अवजड वाहनांना मनोर (टेन नाका) येथून डावे वळण घेऊन पोशेरी-पाली-वाडा नाका-शिरीष पाडा येथून अंबाडी, भिवंडीमार्गे प्रवास करता येणार आहे. पालघर, वसईकडून येणाऱ्या वाहनांना चिंचोटीमार्गे कामण, खारबाव, अंजूरफाटा, भिवंडी या मार्गाचा वापर करता येणार आहे. मात्र वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर न केल्यामुळे आज ही प्रचंड वाहतूककोंडी झाली आणि वाहन चालक त्यात अनेक तास अडकून पडले…वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन भाईंदरचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी केले आहे.