विमानाच्या हेलकाव्यांनंतर कडक नियम, सीटबेल्टचा सिग्नल मिळताच भोजन सेवा थांबणार!

लंडनहून सिंगापूरला जात असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सच्या फ्लाईटने जबरदस्त हेलकावे खाल्ल्यानंतर एका प्रवाशाचा जीव गेला. तसेच शेकडो लोक जखमी झाले असून अनेकांवर अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर सिंगापूर एअरलाईन्सने नियमांत बदल केले आहेत. सिंगापूरच्या नव्या नियमानुसार, विमानात सीटबेल्टचा सिग्नल मिळाल्यानंतर भोजन सेवा थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानात होणाऱ्या हेलकाव्याच्या दुर्घटनेनंतर हा नियम बनवण्यात आला आहे.

अचानक झालेल्या या हेलकाव्यामुळे विमानातील प्रवाशांना जबरदस्त धक्के बसले असून यात 104 प्रवासी जखमी झाल्याची अधिकृत माहिती आता समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 22 प्रवाशांच्या पाठीचा मणका तुटला आहे, तर अन्य 6 लोकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याआधी 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली होती, परंतु आता अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

– सिंगापूर एअरलाईन्सच्या बोइंग 777-300ईआर फ्लाईटला म्यानमारच्या आकाशात 21 मे रोजी हवेत हेलकावे खावे लागले होते. विमानातील अनेक लोकांना डोक्याला, कंबरेला, पाठीच्या कण्याला आणि हाताला दुखापती झाल्या आहेत. जखमींवर बँकॉक येथील समीतीज श्रीनाकरण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 6 जणांना डोक्याला, 22 जणांना मणक्याला आणि 13 जणांना हाडांसह इतर ठिकाणी दुखापत झाली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक अदिनान कित्तीर्तनपाईबुल यांनी दिली.