Dombivli blast – भीषण स्फोटात 90 कुटुंबे उद्ध्वस्त; मृतदेहांची ओळख पटेना, डीएनए टेस्ट करणार

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात जवळपास 9 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत 13 कामगारांचा बळी गेला असून 68 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक कुटुंबांनी कर्ता पुरुष या दुर्घटनेत गमावला आहे, तर 50 हून अधिक कामगार गंभीर जखमी असून अनेकांनी हात आणि पाय गमावला आहे. कायमचे अपंगत्व घेऊन त्यांना आयुष्य काढावे लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 13 पैकी 11 मृतदेहांची ओळखच पटलेली नाही. छिन्नविच्छिन्न मृतदेह डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता कुटुंबीयांतील सदस्यांची डीएनए टेस्ट केली जात आहे. डीएनएचा अहवाल आल्यानंतरच संबंधित कुटुंबीयांना मृतदेह दिले जाणार आहेत.

एमआयडीसी फेस-२मधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलर फुटून भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत पहिल्या दिवशी आठ कामगारांचे मृतदेह मिळाले. दुसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखालून आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज दोन मृतदेहांचे अवशेष मिळाले. आतापर्यंत 13 मृतदेह मिळाले आहेत. पैकी फक्त दोन महिला कामगारांची ओळख पटल्याने त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असले तरी अजूनही 11 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे बेपत्ता कामगारांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.

दुर्घटना घडून तीन दिवस झाल्यानंतरही मृतदेहांची ओळख पटत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे. स्फोट इतका भीषण होता की अनेकांच्या मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या आहेत. स्फोटात अमुदान कंपनीसह आजूबाजूच्या 13 कंपन्या बेचिराख झाले आहेत. या कंपन्यांमधील बेपत्ता कामगारांची एकत्रित नोंदणी करण्यात आली आहे. या कामगारांच्या कुटुंबीयातील रक्ताच्या नात्यातील सदस्यांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे. या टेस्टचा अहवाल आल्यानंतरच मृतदेहांची ओळख पटवून कुटुंबीयांना मृतदेह दिले जाणार आहेत.

आठ कुटुंबीयांची रक्त चाचणी

अमुदान स्फोटानंतर मृतदेह आणि वेगवेगळे अवशेष शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. काही मृतदेहांची ओळख पटत नसल्याने बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांची डीएनए टेस्ट केली जात आहे. आतापर्यंत आठ कुटुंबातील सदस्यांची शास्त्रीनगर आणि कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात डीएनए टेस्ट केली असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांनी दिली. हे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मृतदेह कुणाच्याही ताब्यात दिले जाणार नाहीत. ओळख पटल्यानंतरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शोधकार्य सुरूच… आणखी दोन मृतदेह सापडले

अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर तिसऱ्या दिवशीही बेपत्ता कामगारांचे शोधकार्य सुरूच होते. केडीएमसीचे अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा इमारती कोसळल्यानंतर साचलेले ढिगारे आणि लोखंडी सांगाडे हलवण्याचे काम करत आहेत. केमिकल स्फोटामुळे मृतांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे शोधकार्य जपून करावे लागत असून आज आणखी दोन मृतदेहांचे अवशेष सापडले. या सर्व ठिकाणी रविवारीही शोधकार्य सुरूच ठेवले जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांनी दिली.

बंद कंपनी दीड महिन्यापूर्वी सुरू

अमुदान कंपनी अनेक वर्षांपासून बंद होती. दीड महिन्यांपूर्वीच ती नव्याने सुरू केली होती. मात्र या कंपनीत रासायनिक उत्पादन घेतले जात असताना सुरक्षेशी संबंधित कोणतीही खबरदारी घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. शिवाय कच्चा माल आणि तयार उत्पादने यांच्या साठवणुकीकडे दुर्लक्ष केले गेले होते. बॉयलर आणि रिअॅक्टरच्या देखभालीकडेही केलेले दुर्लक्ष कामगारांच्या जीवावर बेतले.

मलय मेहताला पोलीस कोठडी

अमुदानच्या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मालक मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आई मालतीला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने मलय मेहताला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलय मेहता याची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. अमुदान केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया आणि साठवणुकीमध्ये खबरदारी न घेतल्याने हा स्फोट झाला. एमआयडीसी परिसरातील फेज दोनमधील प्लांटमध्ये गुरुवारी झालेला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. यामध्ये आतापर्यंत 13 मृत्यू आणि 64 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटानंतर सुमारे 12 तासांनंतर शुक्रवारी पहाटे दीड वाजता मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

40 जखमींना डिस्चार्ज

स्फोटातील जखमींवर पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयासह नेपच्युन, एम्स या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 40 जखमींवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अजूनही 28 गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.