सिनेविश्व – कियारा अडवाणीची धडाकेबाज वाटचाल

>> दिलीप ठाकूर

‘तू लग्नानंतरही चित्रपटातून भूमिका साकारणार का?’ या हुकमी प्रश्नामागची खोच अशी होती की, विवाहित अभिनेत्रीमध्ये सिनेरसिक आपली शेजारीण, मैत्रीण, सखी वा प्रेयसी पाहणार नाहीत आणि तिलाही अन्य नायकासोबत प्रणय प्रसंगात रंग भरताना कसेसेच होईल. करीअर उत्तम सुरू असतानाच शर्मिला टागोरने क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडीसोबत लग्न केले आणि नंतरही तिने रूपेरी पडद्यावर प्रेम प्रसंगात रंग भरला. मौशमी चटर्जी तर लग्न झाल्यावर मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आली आणि त्या काळातील यशस्वी पारंपरिक नायिका ठरली.

आजच्या ग्लोबल युगात ‘नटीचं लग्न झालंय का?’ असा प्रश्न ना मीडिया विचारत, ना चित्रपट रसिक तसा विचार करत, ना चित्रपटसृष्टी तिला नवीन चित्रपटाची ऑफर करताना तसा विचार करत. प्रगती म्हणतात ती अशीदेखील.

कियारा अडवाणीचे बघा. 2014 च्या ‘फुगली’ या चित्रपटापासून ती मनोरंजन उद्योगात काम करत आहे. तिने भूमिका केलेल्या चित्रपटांपैकी फक्त दोनच उल्लेखनीय आहेत. एक म्हणजे नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ आणि संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग!’ या दोन्हीत तिला फार स्कोप नव्हताच, पण दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामुळे कियाराला बरेच नवीन चित्रपट मिळाले. हिंदीबरोबरच तिने तेलुगू चित्रपटात, व्हिडीओ अल्बममध्ये काम केले आणि अशातच तिने 7 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ मल्होत्राशी राजस्थानातील जैसमलैर येथे अतिशय थाटात लग्न केले. लग्नानंतर तिच्या वाटचालीचा वेग अगदी व्यवस्थित आहे. मोठय़ा प्रमाणावर ती जाहिरातपटात दिसू लागली आहे. आता तर तिने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे दिलखुलास दर्शन घडवत सोशल मीडियात भरभरून लाइक्स मिळवल्या.

एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ती व सिद्धार्थ एखाद्या इव्हेण्टला अथवा विदेशी निघतात, तेव्हा ती अनेकदा पुढे असते. तिच्या देहबोलीत निश्चितता दिसते आणि तो काहीसा बुजलेला वाटतो. यशासोबत उंचावलेला आत्मविश्वास तिच्यात दिसतोय. सोशल मीडियात तशा रील्सही पाहायला मिळतात आणि याच तिच्या यशोगाथेत तीन मोठय़ा चित्रपटांची संधी आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंगची नायिका, गीतू मोहनदास दिग्दर्शित व व्यंकट नारायण दिग्दर्शित `Toxi a fairy tale for grown ups’ या तामीळ भाषेतील चित्रपटात दक्षिणेकडील सुपरस्टार यशची नायिका आणि शंकर दिग्दर्शित ‘गेम चेंजर’ यात राचरणची नायिका… अशा एकाच वेळेस तेलुगू, तामीळ व हिंदीतील हुकमाचे तीन पत्ते तिला मिळालेत. आज दक्षिणेकडील चित्रपटांनी आपले साम्राज्य वाढवलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रालाही आपल्या पत्नीच्या या धडाकेबाज वाटचालीचा नक्कीच आनंद वाटत असेल. त्याचा पायगुण तिला फळला म्हणायचं.

आज आलिया भट्ट, रश्मिका मंदान्ना आणि कियारा अडवाणी या आघाडीच्या तीन तारका आहेत. एका वेगळय़ाच टप्प्यावर या नायिकांचा प्रवास येऊन पोहोचला आहे.

z [email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)