‘रेड अलर्ट’ उन्हाचा अन् पावसाचा! केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर

केरळमध्ये याच महिन्यात 31 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु त्याआधीच केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामान खात्याने पुढील दोन दिवस केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. केरळच्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे. मात्र त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एर्नाकुलम आणि त्रिशूर जिह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या इतर आठ जिह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे. केरळमध्ये पाऊस सुरू असल्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक ढगफुटी किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच काही ठिकाणी सखल भागात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच मच्छीमारांनी केरळ किनारपट्टीवर समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रात मान्सून कधी?

नैऋत्य मान्सून केरळमध्ये 31 मेपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हिंदुस्थानी हवामान विभागाने वर्तवला आहे, तर मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून 10 ते 11 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

केरळ राज्यात 19 मेपासून आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसाने विविध जिह्यांत धुमाकूळ घातला आहे. सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 218 घरांचे नुकसान झाले आहे.

सहा राज्यांत उष्णतेची लाट, राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू

देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट आली आहे. ही लाट 2 जूनपर्यंत असेल. या काळात देशाच्या काही भागांत तापमान 49 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असे हवामान खात्याने शनिवारी सांगितले. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा ’रेड अलर्ट’ जारी केला आहे. राजस्थानमध्ये उन्हाची तीक्रता खूप वाढली असून गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने 13 जणांचा बळी गेला आहे. तर दुसरीकडे कश्मीर खोऱयातही तापमान प्रचंड वाढले आहे. उन्हामुळे भोपाळहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान शुक्रवारी एक तास उशिराने निघाले. बाहेरील तापमान जास्त असल्याने इंजिन रिस्ट्रिक्टेड मोडमध्ये गेले होते. त्यामुळे भोपाळमध्ये काही उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली. राजस्थानमधील सर्व शहरांतील स्वच्छता कर्मचाऱयांना उन्हाच्या बचावासाठी पहाटे 5 ते 10 या वेळेत काम करण्यची मुभा
पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.