पिके जगवण्यासाठी मुळा डावा कालव्याचे आवर्तन सोडा; लाभधारक शेतकऱयांची मागणी

शेतातील उभी पिके जगविण्यासाठी मुळा डावा कालव्यातून शेती पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मानोरी येथील लाभधारक शेतकऱयांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, यंदा उन्हाळ्याच्या वाढत्या तीक्रतेमुळे शेतीपिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी मुळा धरणातून डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, आता उन्हाचा तडाखा बसल्याने मका, घास व इतर चारा पिके जळून चालल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी 650 दशलक्ष घनफूट पाण्याची मुळा पाटबंधारे विभागाकडे तरतूद आहे. मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या चार तालुक्यांतील 82 हजार हेक्टर क्षेत्र, तर मुळा डावा कालव्याखाली 10 हजार 169 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. धरणाचा शनिवार 4 मेपर्यंतचा पाणीसाठा 8 हजार 362 दशलक्ष घनफूट असल्याने डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात शेती पाण्याचे एक आवर्तन देणे शक्य होणार आहे. त्यामुळे डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पाण्याच्या एक आवर्तनाची तरतूद करून शेतीतील उभी पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी रावसाहेब आरंगळे, शंकर सपकाळ, पांडुरंग देठे, नवनाथ आढाव, नीलेश पोटे, सुरेश थेवरकर आदी लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामातील पाणी आवर्तन सुरू असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. धरणातील पाण्याचा 8 हजार 362 दशलक्ष घनफूट पाणीसाठा पाहाता मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात 600 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात यावे.

– शंकर सपकाळ, शेतकरी.