झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; मंत्र्याच्या सचिवाकडील नोकराकडे नोटांचे घबाड

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. या करावाईत ईडीला कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. कोणत्याही उद्योजक किंवा राजकीय नेत्याकडे हे घबाड सापडले नसून एका मंत्र्याच्या खासगी सचिवाकाकडील नोकराकडे हे कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. हे मनी लँडरींग आणि काळ्या पैशांचे प्रकरण असल्याचे ईडीने म्हटले आहे. हे कोट्यवधींचे घबाड मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे ईडीने म्हटले आहे.

झारखंडमध्ये ईडीने ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचा खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीने कारवाई केली. त्यात ही कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडीने रांची येथील विविध ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यात ही रोकड सापडली आहे. हे नोटांचे घबाड 40 ते 50 कोटी असल्याचा अंदाज आहे. हे पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आले आहे.

ईडीने ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाच्या एका नोकराच्या घरी धाड टाकली. त्यात हे नोटांचे घबाड सापडले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सापडलेल्या या मोठ्या रक्कमेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे 4 वेळा आमदार झाले आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी रांचीसह अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात मंत्री आलमगीर आलमचे खासगी सचिव असलेले संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांच्या घरी शोध घेतला. त्यावेळी नोकराच्या घरी सापडलेली रक्कम पाहून अधिकारीही चकीत झाले.

याप्रकरणी ईडीनं अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना याआधीच ताब्यात घेतले आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.