बांगलादेशात ‘रेमल’ चक्रीवादळाचे थैमान, पश्चिम बंगाल बचावले

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री बांगलादेशात धडकले. तब्बल सहा तास या चक्रीवादळाने बांगलादेशात थैमान घातले. या काळात वाऱयाचा वेग ताशी तब्बल 120 ते 135 किमी इतका होता. पश्चिम बंगालमधील सागर बेटाच्या खेपाडा येथे स्पर्शून हे वादळ पुढे सरकले. त्यामुळे पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर, सुंदरबन खारफुटीचा धोका टळला. मात्र अजूनही या वादळाच्या प्रभावाने पश्चिम बंगालमध्ये नुकसान होण्याची शक्यता असल्याने विविध यंत्रणा सतर्कतेचा उपाय म्हणून बचावकार्यासाठी सज्ज असल्याचे वृत्त आहे.

वादळाच्या धोक्यामुळे कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ रविवारी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे 394 विमान उड्डाणे रद्द करण्यता आली. तर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आणि उत्तर 24 परगणा तसेच पूर्व मेदिनीपूर जिह्यातून जाणाऱया काही गाडय़ा रद्द केल्या.

पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ

रेमलचा प्रभाव पूर्व मेदिनीपूर, सुंदरबन, पश्चिम बंगालमधील त्रिपुरा आणि ओदिशाच्या किनारी जिह्यांमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक या भागात राहाणारे रहिवासी आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या कामाला जुंपले आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरात या मोसमात निर्माण होणारे हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ आहे. हे नाव ओमानने दिले असून रेमल हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ वाळू असा आहे.

8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

‘रेमल’ या चक्रीवादळाच्या भीतीने बांगलादेशात समुद्रकिनारी राहणाऱया तब्बल आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे समुद्रात 8 ते 12 फूट उंचीच्या लाटा उसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून बांगलादेशात अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, बांगलादेशात 1 हजार 185 वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पश्चिम बंगालमध्ये पाऊस

या वादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्रिपुरा सरकारनेही दक्षिण त्रिपुरा, धलाई, खोवाई आणि पश्चिम त्रिपुरा या चार जिह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची तसेच अतीवृष्टीची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.